
बैलूर पंचायत पंचनामा भाग – 1
ऑपरेटर निलेश मादार याने आपली पत्नी अश्विनी मादार हिच्या नावावर नरेगाचे पैशे वर्ग केल्याची समाजसेवक जोतिबा भेंडीगेरी यांची तक्रार!
जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
जांबोटी जोखीम पंचायत विभागात मोठी पंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैलूर ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात महात्मा गांधी नरेगा योजनेत मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला असून, स्वतः ऑपरेटर निलेश मादार याने आपल्या पत्नीच्या नावावर नरेगाचे पैशे जमा करून घेतल्याचा आरोप करत, समाजसेवक जोतिबा भेंडीगेरी यांनी जिल्हा पंचायत सीईओंकडे थेट तक्रार केली होती, त्याची दखल घेत तत्काळ या कामासंदर्भातील सर्व कागदपत्रे सादर करण्याचा आदेश जिल्हा पंचायत सीईओनी ईओना दिला आहे. त्यामुळे लवकरात लवकर गोंधळाची चौकशी होणार असल्याची माहिती समाजसेवक जोतिबा भेंडीगेरी यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना दिली.
कसा झाला हा गोंधळ; अधिकारी कसा तपास लावणार??
समाजसेवक जोतिबा भेंडीगेरी यांनी जिल्हा पंचायत सीईओंकडे दिलेल्या तक्रारीनुसार कुसमळी वॉर्डमधील भाग्यश्री श्रीधर पाटील यांच्या नावावरील (जॉब कार्ड नं. 2498) नरेगाचे पैशे ऑपरेटर निलेश मादार याने आपली पत्नी अश्विनी निलेश मादार हिच्या नावावर कायम वर्ग केल्याची ( जमा) तक्रार आहे. याचप्रमाणे रेखा पाटील, सिद्धाप्पा पाटील, नामदेव कालकुंद्रीकर, ज्ञानेश्वर बिरू येडगे, चाळोबा गुंडू सदावरकर, प्रसन्ना पांडुरंग सुतार, सोमनाथ के. हलगेकर, अशोक मारुती बिर्जे, तुळसा विशाल खामकर यांची जॉब कार्ड वापरून पैशे उकळण्याचा आरोप सदर तक्रारीत करण्यात आला असून, नोंद केलेल्या सर्व नागरिकांची बँक खाती व निलेश मादार यांच्या पत्नी अश्विनी निलेश मादार (रा. शिंपेवाडी, ग्रा. पं. गुंजी) यांचेही बँक खाते तत्काळ चेक करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये संबंधित पंचायत व तालुका पंचायतीचेही अधिकारीही सामील असल्याची दाट शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

काय आहे जिल्हा पंचायत सीईओंचा आदेश…
समाजसेवक जोतिबा गंगाराम भेंडीगेरी (रा. मसकेनहट्टी पो. भुरणकी ) यांनी एप्रिल महिन्याच्या 4 तारखेला अर्ज जिल्हा पंचायत सीईओंना तक्रार अर्ज दाखल केला होता, त्याची दखल घेऊन 8 मेला बैलूर पंचायत नरेगा कामाची चौकशी करून तत्काळ त्या संदर्भातील कागदपत्रे सादर करण्याचा आदेश जिल्हा पंचायत सीईओंनी ईओंना दिला आहे. त्यानुसार कारवाई सुरू झाली असल्याची माहिती तक्रारदार जोतिबा भेंडीगेरी यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना दिली.







Leave a Reply