सर्वांनी ‘साईंच्या’ भक्तीचा ‘आनंद’ घ्या: आ. विठ्ठल हलगेकर!


खानापूर दुर्गानगरात श्री साईबाबा मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना; मान्यवरांची उपस्थिती…

   

खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

     आजच्या धावपळीच्या युगात व्यावसायिकबरोबर धार्मिकताही मानवी जीवनातील महत्वाचा पैलू मानला जातो. धार्मिकता आणि भक्तिमार्ग म्हणजेच जीवनातील समाधान असल्याचे आज मान्य केले जाते. त्यात शिर्डी साईबाबांच्या भक्तीत तर अनोखा आनंद आहे, तो प्रत्येकाने घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्हीं साई मंदिर उभारण्याचा केलेला संकल्प खूप मोलाचा आहे, याबद्दल आयोजकांचे कौतुकच करतो, असे मत आमदार विठ्ठल हलगेकर यांनी व्यक्त केले. खानापूर दुर्गानगर येथे श्री साईबाबांचे मंदिर आणि त्यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अमृत पाटील होते. यावेळी भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य प्रमोद कोचेरी, जिल्हा भाजप उपाध्यक्ष संजय कुबल, सचिव गुंडू तोपीनकट्टी, मनमंदिरा सोसायटीचे अध्यक्ष भारमाणी पाटील, म. ए. समिती नेते बाबासाहेब दळवी, माजी नगरसेविका लता पाटील, मेघा कुंदरगी, एलन बोरझीस यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

      पुढे बोलतांना आमदार हलगेकर म्हणाले की, आमदार फंडातून या मंदिरासाठी 5 लाखाचा निधी मंजूर करण्याची हमी दिली. आपण केलेला मंदिर बांधण्याचा उपक्रम महत्वाचा असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

तीन दिवस चालले विविध धार्मिक कार्यक्रम…

    येथील साई मंदिर व मूर्ती प्राणप्रतिष्ठापनानिमित्त तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी भव्य मिरवणूक काढण्यात आली, बुधवारी होम -हवन विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. तसेच गुरुवारी कालसारोहण, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व मंदिर उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला.

   

    


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *