हत्तरगुंजी नागरिकांच्या निवेदनावर दिली माहिती; पुढील महिन्यात तहसीलदारांसह अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन काढणार तोडगा…

बेळगांव/ खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
हत्तरगुंजी (ता. खानापूर) येथील गायरांनचा तिढा अधिकच वाढत चालला असून, अतिक्रमण करणाऱ्या लोकांची मनमानी वाढतच चालली असून, गावकऱ्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावचे गायरान असतानाही गावकऱ्यांना तेथे जाण्यास मज्जाव आणला जात आहे. अनेकवेळा तहसिलदार सबंधित अधिकाऱ्यांना निवेदन पूर्वकल्पना देऊन झाले तरी अद्याप अधिकाऱ्यांकडून म्हणावी तशी ठोस कारवाई झाली नाही,तर दुसरीकडे अतिक्रमण करणारे तेथुन जागा सोडण्यास तयार नाहीत. अशा दुहेरी संकटात येथील गावकरी सापडले आहेत. त्यामुळे गुरुवारी ॲड. आकाश अथणिकर यांच्या नेतृत्वाखाली माजी ग्राम पंचायत सदस्य बळीराम वांद्रे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी महमद रोशन यांना निवेदन देण्यात आले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कोणालाही गायरान जमिनीवर अतिक्रमण करताच येणार नसल्याचे सांगितले.
पुढच्या महिन्यात खानापुरात तहसीलदारांसह अधिकाऱ्यांशी बैठक बोलवू: डीसी…
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ( दि.1) तहसीलदार, गावकरी आणि अधिकाऱ्यांची खानापुरात बैठक बोलावून याविषयावर ठोस तोडगा काढण्यात येईल अशी हमी डीसीनी नागरिकांना दिली. या कायदेशीर लढ्याला अँड आकाश अथणिकर यांचे मोठे योगदान लाभले आहे.