केसरेकर कुटुंबाचे पालकत्व सरकारने घ्यावे, बैठकीत ठराव मंजूर
खानापूर : लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

सांगली जिल्ह्यातील कुपवाडमध्ये मूळच्या हेब्बाळच्या मोहन केसरेकर आणि मनिषा केसरेकर यांची अमानुषपणे हत्या करणाऱ्या फरीद शेख या आतंकवाद्याला तात्काळ फाशी झालीच पाहिजे अशी मागणी करत, त्या घटनेचा यावेळी जाहीर निषेध करण्यात आला. खानापूर तालुका निवृत शिक्षक संघाच्या मासिक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच त्यांच्या कुटुंबाचे पालकत्व महाराष्ट्र शासनाने घ्यावे या सर्व मुद्यांवर यावेळी ठरावही करण्यात आला. संत ज्ञानेश्वर मंदिरात पार पडलेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी डी. एम. भोसले होते.
बैठकीच्या प्रारंभी ए. आर. मुतकेकर यांनी प्रास्ताविक केले. केसरेकर दाम्पत्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे परिसरात निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक संघाच्या सदस्यांनी या घटनेचा जाहीर निषेध नोंदविला. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी आणि पीडित कुटुंबाला शासनाने आवश्यक ती मदत व संरक्षण द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान, कै. गोपाळ गावडे कोलिक यांच्या पत्नीला पेन्शन लागू करण्याबाबतचा ठरावही मंजूर करण्यात आला. तसेच कणकुंबी येथील कॅनरा बँकेच्या व्यवस्थापकांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी तीन सदस्यांचा वाढदिवस साजरा…
बैठकीत संघटनेचे अध्यक्ष डी. एम. भोसले, सचिव ए. एम. पाटील आणि सभासद एम. के. काकतकर या तीन शिक्षक सभासदांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. बी. एन. पाटील, जे. बी. पाटील, एम. पी. कदम, जी. डी. देसाई, वाय. बी. पाटील, व्ही. यू. देसाई यांच्यासह उपस्थित शिक्षक सभासदांनी वाढदिवसाच्या सत्कारमूर्तींना शुभेच्छा दिल्या. एन. जे. गुरव यांनी आभार मानले.