छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन..
आमटे: लोकहित न्यूज
आमटेत (ता. खानापूर) 1 ते 2 एप्रिलला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त शिवसृष्टी अवतरणार आहे. दोन दिवस भरगच्च भगवेमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज तथा महाराष्ट्र बांधकाम मंत्री शिवराजसिंहराजे भोसले यांच्याहस्ते पुतळ्याचे अनावरण होईल. त्यानिमित्त जिल्ह्यातील आजी -माजी आमदार, तालुक्यांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शिवशक्ती युवक मंडळ व गावकऱ्यांचा वर्षभरात संकल्प पूर्ण…
छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे आदर्श प्रेरणास्थान आहेत, त्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची प्रेरणा आज चारशे वर्षानंतरही समाजात जिवंत आहे. तीच प्रेरणा आमटे गावातील नागरिकात व भविष्यात येणाऱ्या पिढीमध्ये कायम रहावी असा दृढनिश्चय करत येथील शिवशक्ती युवक मंडळ व गावच्या पंचकमिटी यांच्यावतीने वर्षभरापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व सुसज्ज चौथरा उभारण्याचा संकल्प आखण्यात आला अन् तो ठरलेल्या वेळेत पूर्णही केला . याबद्दल भागातून कौतुक होत आहे..त्यासाठी शिवशक्ती युवक यांच्या अथक प्रयत्नाने व गावकरी पंच मंडळींच्या सहकार्यातून वर्षभरातच हा संकल्प पूर्ण करत समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. त्याचे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे, अशा प्रतिक्रिया शिवप्रेमी व भागातून उमटत आहेत.
भरगच्च भगवेमय कार्यक्रम; मान्यवरांची उपस्थिती …
1 ते 2 एप्रिल असे दोन दिवस भरगच्च भगवेमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 1 रोजी छत्रपतींच्या मूर्तीचे जांबोटीत आगमन होणार असून, तेथून आमटे गावापर्यंत भव्य अशी मिरवणूक काढण्यात येईल. तर दुसऱ्या दिवशी पुतळ्याचे मान्यवरांच्याहस्ते अनावरण व लोकार्पण सोहळा पार पडेल. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आ. विठ्ठल हकगेकर, माजी आ. संजय पाटील, मा. आ. अरविंद पाटील , राहुल तेंडुलकर उद्योजक, गोवा. यांच्यासह जिल्ह्यातील आजी -माजी मान्यवर, शिवप्रेमी उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply