गर्लगुंजी ग्राम पंचायतीचे माजी सदस्य प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांचे पालकमंत्री, महसूल मंत्री,डीसी, तहसीलदारांना निवेदन…
खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
यंदा आधीच पाऊस कमी झाला असून, गेल्या महिन्यापासून पावसाचे प्रमाण कमालीचे कमी झाले आहे.परिणामी आतापासूनच पाण्याचे प्रमाण कमी होत चालले असून, पुढील उन्हाळी चार महिने कसे काढणार? असा प्रश्न उपस्थित करत खानापूर तालुका दुष्काळी तालुका म्हणून घोषित करा, शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करा, भविष्यातील पाणी टंचाई टाळण्यासाठी आताच कृत्रिम पाऊस पाडण्याची मोहीम हाती घ्यावी अशा मागणीचे निवेदन महसूलमंत्री जी. पी .परमेश्वर , पालकमंत्री सतीश जार्कीहोळी तसेच जिल्हाधिकारी तहसीलदारांना माजी गर्लगुंजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांकडून देण्यात आले
असे आहे सदर निवेदन…
आम्ही खानापूर तालुक्यातील शेतकरी आपणास विनंती करतो की, खानापूर तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत. पावसामुळे खानापूर तालुका, बेळगाव तालुका आणि आसपासच्या परिसरात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कृत्रिम पावसासाठी उपाययोजना करणे आणि शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करणे यांसाठी आपण पुढाकार घ्यावा. आमच्या भागातील भीषण दुष्काळी परिस्थिती आपल्या त्वरित निदर्शनास आणण्यासाठी खानापूरचे रहिवासी आणि शेतकरी म्हणून आम्ही ही विनंती करत आहोत. पुरेसा पाऊस न पडल्यामुळे आणि भूगर्भातील पाण्याची पातळी खालावल्यामुळे, आमच्या भागात शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. शेतातील पिके करपून गेली आहेत, ज्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे; तसेच जनावरांना चारा आणि पाण्याची तीव्र टंचाई भासते.
जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करा..
यात लक्ष घालून खालील उपाययोजना त्वरित कराव्यात: पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पथक पाठवावे आणि बाधित शेतकऱ्यांसाठी मदत किंवा नुकसानभरपाईची प्रक्रिया सुरू करावी; जनावरांसाठी चारा पुरवावा आणि पाळीव प्राण्यांसाठी तात्पुरत्या पाण्याच्या टाक्यांची (पाणी कुंड्यांची) सोय करावी. स्थानिक लोकांचे दुःख दूर करण्यासाठी आपण त्वरित कार्यवाही कराल, अशी आम्हाला मनापासून आशा आहे.
