खानापूर ब्लॉक काँग्रेस शिष्ट मंडळाची आमगावला भेट; लेखी मागण्या द्या, सरकारला पाठवू – वनखाते.
आमगाव: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
भीमगड अभयारण्यामुळे विकासकामे, मूलभूत सुविधा मिळणे जवळपास कठीण बनल्याने स्थलांतर हाच उत्तम पर्याय म्हणून आमगाव ( ता खानापूर) गावासमोर उरला आहे. त्यानुसार गावकरी स्थलांतराला तयार आहेत, मात्र, मूलभूत सुविधा,15 लाख रुपये अर्थिक मदत शिवाय पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्याशिवाय आम्हीं गाव सोडणार नाही, असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे. आज अखिल भारतीय काँग्रेस सचिव तथा माजी आमदार डॉ.अंजली निंबाळकर यांच्या सूचनेनुसार तालुका ब्लॉक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आमगावला भेट देवून गावकऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी गावकऱ्यांनी आपापले म्हणणे मांडले, यातून एकच मागणी समोर आली , 15 लाख अर्थिक मदत, सोडलेल्या जमिनीच्या बदल्यात पर्यायी जागा, त्याशिवाय शाळा, वीज रस्ते, पाण्यासह मुलभूत सुविधा सरकारने प्रत्यक्षात कार्यवाहीने मिळवून द्याव्यात अशी जोरदार मागणी लावून धरली, या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय गाव सोडणार नसल्याचा पवित्रा आमगावकरांनी घेतला आहे.
मा.आ. तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी मागणी पूर्ण करण्यावर भर देतील ; तालुका ब्लॉक काँग्रेस..

आमगाव गावकऱ्यांना प्रत्युत्तरादाखल ब्लॉक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार तथा अखिल भारतीय काँग्रेस सचिव डॉ.अंजली यांनी लवकरच खानापूरला येणार आहेत, त्यावेळी त्या महसूल मंत्र्यांसह वनखाते व सबंधित मंत्री व आधिकाऱ्यांशी बोलून आपली मागणी पूर्ण करण्यावर भर देतील अशी हमी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष ॲड. ईश्वर घाडी, सुरेश जाधव, काँग्रेस कमिटीने गावकऱ्यांना दिली. यावेळी ईश्वर बोबाटे, दिपक कवठणकर व गावकरी उपस्थित होते.
…लेखी पत्र द्या, सरकारपर्यंत पोहचवू – वनखाते …
तुमच्या गावचे स्थलांतर होणे गरजेचे आहे, त्यासाठी आमच्याकडुन लागेल ती मदत आम्हीं करू. पण, तुम्हीं तसे लेखी पत्र आम्हाला द्या, तसा अहवाल आम्हीं सरकारकडे पाठवू असे आश्वासन वनखात्याच्यावतीने डीएफओ नदाफ यांनी गावकरी आणि काँग्रेस कमिटीच्या बैठकीत दिले. यावर लवकरच आम्हीं लेखी पत्र देवू असे उत्तर गावकऱ्यांनी दिले.






Leave a Reply