खानापूर -जांबोटी, बैलूर रस्ता बनला मृत्यूचा सापळा; साधे खड्डेही सरकारला बुजवता येईनात का?..
जांबोटी: लोकहित न्यूज ( विशेष प्रतिनिधी)
नियोजनाअभावी बेळगांव -जांबोटी -चोर्ला मार्गावरील कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील जुने ब्रिटिशकालीन पुल पाडून त्याठिकाणी नविन पुलाची उभारणी करण्यात येत आहे, मात्र, सुरवातीपासूनच या कामाचे नियोजन चुकीच्या पद्धतीने केल्याने याचे परिणाम आज संपूर्ण जांबोटी भागांतील जनता आणि गोवा – कर्नाटक राज्यातील प्रवाशांना भोगावे लागत आहेत. चोर्ला मार्गाने जनाऱ्या संपूर्ण वाहतुकीचा भार बैलुर रस्त्यावर पडल्याने या रस्त्यावर तळी साचली आहेत, त्यामुळे बैलुर रस्ता होता काय? असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. परिणामी धोकादायक खड्ड्यांमुळे कोणत्याही क्षणी बस कलंडण्याची भीती आहे. त्यामुळें प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. परवा परवा थोडक्यात एक बस पडता पडता सुदैवाने वाचली. भविष्यात अशी एखादी घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. तशीच अवस्था जांबोटी -खानापूर रस्त्याची झाली आहे. या रस्त्यानेही दुचाकीला चालवणे कठीण होवून बसले आहे.
…..तालुक्यात पीडब्ल्यूडी खाते आहे का?
तालुक्यांतील रस्त्यांची दुरवस्था झालेली असताना पी पीडब्ल्यूडी खात्याकडून कोणत्याच उपाययोजना केल्या जात नाहीत. नवीन रस्ते बनविण्याचे राहिले बाजुला, पण, असलेल्या रस्त्यांवरून वाहणारे पाणी बाजूला काढणे सुद्धा जमत नाही का? असा संतप्त सवाल नागरिकांतून विचारण्यात येत आहे. कारण, बहुतेक रस्ते पाण्यामुळे आधिक खराब झाल्याची परिस्थिती आहे. बाजूच्या गटारीमधील निचरा स्वच्छ केले तर रस्त्यांवरून पाणी वाहणार नाही. तेही काम बांधकाम खात्याला जमले नाहीं. त्यामूळे खानापुर तालुक्यात पीडब्ल्यूडी खाते आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.. पडलेल्या खड्यांमध्ये तात्पुरती खडी टाकली तरी वाहतूकीसाठी सुखकर होईल.
…..काय म्हणतात आमदारसाहेब…
याबाबत आ. विठ्ठल हलगेकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले पावसाळा असल्यामुळे रस्ते दुरुस्तीचे काम चालेना. पाऊस कमी झाला की ही सर्व कामे मार्गी लागतील. बैलुर रस्त्याला दोघांनी टेंडर टाकल्याने कामाला विलंब झाला. तेही काम लवकरच सुरू होईल, सद्या बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना अशा रस्त्यांवर खडी टाकण्याची सूचना केली आहे.
प्रतिक्रिया –
दोन दिवसांत बैलुर,खानापूर – जांबोटी रस्त्यांवर खडी टाकण्यात येईल. पाऊस कमी झाल्यानंतर नवीन रस्त्यांच्या कामांना सुरवात होणार आहे.
- संजय गस्ती, तालुका पीडब्ल्यूडी ऑफिसर ..







Leave a Reply