,

जांबोटी भागांत कोसळधार: आतापर्यंत आमगांव – 1112 तर कणकुंबीत -1002 मिमी पावसाची नोंद..


खानापूर -बेळगांवातही पावसाचा जोर कायम; शेतीपिकांची मोठी नुकसान; नदी,नाले तुडुंब, मारुती मंदीर पाण्याखाली..

खानापूर:: लोकहित न्यूज ( विशेष प्रतिनिधी)

    

   कालपासून पावसाने अधिकच जोर धरला असून, ग्रामीण भागांतील जनजीवन विस्कळित झाले आहे. मंगळवारी तर पावसाच्या जोरदार फटकेबाजीने खानापूर -जांबोटी भागांतील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. मलप्रभा नदीला ओसंडून वाहू लागली आहे, याच नदीवर येणारे हब्बनहट्टीचे श्री स्वयंभू मारुती मंदीर गेल्या चार दिवसांपासून पाण्याखाली गेले आहे. त्यामुळें भाविकांना पायऱ्यांवरूनच दर्शन घ्यावे लागत आहे. यंदा मे महिन्यातच मान्सूनपूर्व पावसाला सुरवात झाली असून,आतापर्यंत राज्यातच सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या आमगावमध्ये 1112 ( अकराशे बारा) मिमी हून अधिक तर त्यापाठोपाठ कणकुंबित 1002 ( एक हजार दोन) मिमी पावसाची नोंद झाली आहे.

सर्वत्र पाणीच पाणी; खानापूर जांबोटी भागांत शेतीपिकांची नुकसान …

     मुसळधार पावसाने सकल भागांसह माळरानावर पाणीच पाणी झाले आहे. छोटे -मोठे नाले भरून वाहत आहेत. परिणामी पावसाने उसंतच दिली नसल्याने खानापूर तालुक्यातील शेती पिकांची नुकसान झाली आहे. पेरणी केलेले भात अद्याप उगवून आले नाहीं, त्यामुळें ते कुसून गेल्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे. तालुक्याच्या नंडगड, बिडी, गर्लगुंजी, जांबोटी, कणकुंबी भागांत बहुतेक ठिकाणी पेरणी केलेले बियाचे भात कुजून गेल्याची दाट शक्यता असून , दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकण्याची भीती आहे. तर लावणी केलेल्या रताळी वेलींचीही पावसामुळे मोठी नुकसान झाली आहे.

 

… बेळगांवमध्येही पावसाचा जोर कायम; कुठे कुठे पाणी आले….

     खानापूर बसवेश्वर चौकात पाणी तुंबले होते, बेळगावमध्येही पावसाचा जोर कायम असून, उद्यमभाग येथील शांतेशा शोरूम (मेनरोड) उत्सव हॉटेलकडून येणारे डोगलभर पाणी तुंबले होते. त्यामुळें वाहतूकदारांना विशेषकरुन दुचाकीस्वाराना मोठया समस्येचा सामना करावा लागला. त्यामुळें मंगळवारी सर्वत्र पावसाचे प्रमाण अधिकच होते.

…….आमगांव आणि कणकुंबी आतापर्यंत पडलेला पाऊस…

        आमगाव – 23 मे ला 73 मिमी, 24 मे ला – 121 मिमी, 25 मे ला – 139 मिमी , 16 जूनला 119 मिमी, 17 जूनला – 201 मिमी, शनिवारी – 130 मिमी, रविवारी पावसाने थोडी उसंत घेतली होती. तर सोमवारी पुन्हा जोर वाढल्याने या ठिकाणीं 112 मिमी, तर मंगळवारी सकाळच्या सत्रात 100 मिमी पाऊस पडला होता तर कणकुंबित 23 मे ला -58 मिमी, 24 मे ला- 107 मिमी, 16 जूनला 102 मिमी, 17 जूनला 186 मिमी, शनिवारी – 112 मिमी, रवीवारी थोडा कमी होता पाउस सोमवारी – 102 मिमी तर मंगळवारी सकाळच्या सत्रात 65 मिमी पाऊस पडला होता. मंगळवारी दिवसभर पावसाने झोडपून काढले आहे , त्यामुळें यादिवशी आमगाव व कणकुंबीसह जांबोटी भागातही पावसाचा अधीक जोर कायम होता. त्यामुळें कमी -अधिक प्रमाणात पडलेला मिळून आमगावमध्ये 1112  हून अधिक मिमी पाऊस झाला तर कणकुंबितही त्या पाठोपाठ 1002 हून अधिक मिमी पावसाची नोंद झाली आहे…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *