खानापूर तालुक्यात श्री महालक्ष्मी ग्रुपच्या विविध संस्थांच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व वार्षिक सभा संपन्न!
खानापूर : लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
आजच्या घडीला सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या जीवनात सहकार क्षेत्रामुळे अनेक बदल झाले असून, त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे, असे मत आमदार तथा महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक, लैला शुगर्सचे चेअरमन विठ्ठल हलगेकर यांनी मांडले.
शुक्रवारी खानापूर येथील शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या सभागृहात श्री महालक्ष्मी ग्रुप तोपीनकट्टी संचालित श्री महालक्ष्मी फार्मर्स प्रोडूसर ऑर्गनायझेशनच्या नूतन इमारतीचे दिमाखदार उद्घाटन संपन्न झाले. याच, सोहळ्यात श्री महालक्ष्मी अग्रीकल्चर प्रोडूस प्रोसेसिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटी आणि श्री महालक्ष्मी जनसेवा को-ऑपरेटिव्ह सोसायटीची संयुक्त वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली, त्यावेळी आमदार अध्यक्ष पदावरून बोलत होते. कार्यक्रमास तालुक्यातील शेकडो शेतकरी, बागायतदार, विविध संस्थांचे संचालक आणि सहकार क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार विठ्ठल हलगेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन..
सहकार क्षेत्र हे केवळ आर्थिक व्यवहाराचे साधन नसून ग्रामीण भागातील सामान्य शेतकरी व सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचे प्रभावी माध्यम आहे. केंद्र सरकारच्या क्रांतिकारी धोरणांनुसार FPO (फार्मर्स प्रोडूसर ऑर्गनायझेशन) आणि सहकारी संस्थांचे जाळे ग्रामीण भागात उभारण्यात आले असून, यामुळे येथील शेतकऱ्यांना शेतीमालाच्या उत्पादनापासून ते थेट विक्रीपर्यंतच्या सर्व सुविधा आता एकाच छताखाली मिळण्यास सुरुवात झाली आहे.
कृषी प्रक्रिया उद्योग आणि मूल्यवर्धन:
शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबतच आधुनिकता आणि जोडधंद्यांकडे वळण्याची गरज आहे. ‘श्री महालक्ष्मी अग्रीकल्चर प्रोडूस प्रोसेसिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटी’च्या माध्यमातून शेतमालावर योग्य प्रक्रिया (प्रतवारी, पॅकेजिंग आणि साठवणूक) केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ होऊ शकते. तसेच खते, दर्जेदार बियाणे, कीटकनाशके व शेती अवजारे यांचे वितरण सुलभ झाले असून, शासनाच्या विविध अनुदान योजनांचा लाभ संघटित संस्थांच्या माध्यमातून सहज मिळत आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष घोषणा:
खानापूर तालुका हा बागायती आणि शेतीप्रधान असून येथील ऊस उत्पादक शेतकरी हा कारखान्याचा खरा मालक आहे. लैला साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या कष्टाचे चीज करण्यासाठी नेहमीच बाजारात टिकून राहील असा सर्वोत्कृष्ट दर दिला जात आहे. तसेच गाळप हंगामात शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी सुटसुटीत तोडणी व वाहतूक व्यवस्था आणि हेक्टरी उत्पादन वाढीसाठी मोफत तांत्रिक व कृषी मार्गदर्शन दिले जात आहे.
पारदर्शक कारभार आणि आर्थिक अनुशासन:
श्री महालक्ष्मी ग्रुपच्या सर्व संस्थांमध्ये संपूर्ण पारदर्शकता राखली जात असून प्रत्येक रुपयाचा हिसाब सभासदांसमोर ठेवला जातो. सभासदांनी आपल्या संस्थांशी असलेले आर्थिक व्यवहार नेहमी नियमित ठेवावेत, जेणेकरून संस्था अधिक सक्षम होऊन अधिकाधिक परतावा, लाभांश आणि कल्याणकारी सवलती सभासदांपर्यंत पोहोचविता येतील, असे आवाहन आमदार हलगेकरांनी केले.
या दिमाखदार सोहळ्यास अरोळी मठाचे परमपूज्य स्वामी श्री. श्री. चन्नबसव देवरू, श्री महालक्ष्मी ग्रुप तोपीनकट्टीचे उपाध्यक्ष श्री. विठ्ठल करंबळकर, खानापूर भाजपा अध्यक्ष बसवराज सानिकोप, ज्येष्ठ संचालक चांगाप्पा निलजकर, लैला साखर कारखान्याचे मॅनेजमेंट डायरेक्टर सदानंद पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि शेकडो शेतकरी उपस्थित होते.