जिवंत कासव, साळिंदरचे मांस सापडल्याने त्यांच्यावर गुंन्हा दाखल; चौघांनाही कोल्हापूरला हलविले; जांबोटी भागातही शिकारीचे प्रकार वाढल्याची स्थानिक वनखात्यात चर्चा…
(शिकारीचा संग्रहित शब्द लोगो)
जांबोटी/ चंदगड: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
चंदगड तालुक्यातील म्हाळुंगे – पाटणे वनक्षेत्रात साळिंदरचे मांस शिजवतांना तसेच जिवंत कासव सापडल्याच्या गुन्ह्याखाली गोल्याळी (ता. खानापूर) येथील चौघे जण महाराष्ट्र वनखाते अधिकाऱ्यांच्या ताब्यात सापडल्याची घटना घडली आहे. देवापा बाबू कुलम (वय 34), तुकाराम शंकर गावडे (वय -40), रामलिंग धोंडिबा गवस (वय- 38) तिघेही रा. गोल्याळी,( ता. खानापूर) , पुंडलिक निंगप्पा गुरव ,(मूळ गाव गोल्याळी ) सध्या राहणार खालसा म्हाळुंगे असे अटक केलेल्यांचे नाव आहे. त्यांच्यावर गुंन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असून, त्यांचे आणखी दोघे साथीदार फरार असल्याचे वृत्त आहे. मलगड याठिकाणी या चौघांनी जिवंत कासव लपवून ठेवला होता तसेच त्याच घरात साळिंदरचे मांस शिजवतांना चौघेही सापडले त्यातील दोघे फरारी झाले आहेत, घटनास्थळी शिकारीचे साहित्य, जेवणाची भांडी, मोबाईल, साळिंदरचे शिल्लक मांस असा एकूण 1 लाख 18 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाटणे वनक्षेत्रपाल शितल पाटील, वनपाल हर्षदा पावसकर, जॉन्सन डिसोजा, बाळासाहेब भांडकोळी, वनरक्षक श्रेयस रायके यांच्या पथकाने ही कारवाई केली.
बैलुर -गोल्याळी – जांबोटी परिसरातही शिकारीचे प्रकार वाढल्याची स्थानिक वनखात्यात वरील घटनेवरून जोरदार चर्चा…
म्हाळुंगे – पाटणे हे क्षेत्र खानापूर आणि चंदगड तालुका वनखात्याची हद्द लागून असून, म्हाळुंगे येथील घटनेनंतर बैलुर, गोल्याळी आणि जांबोटी परिसरातही मोठ्या प्रमाणात जंगली प्राण्यांच्या शिकारीचे प्रकार वाढल्याची चर्चा जोरात सुरू आहे. म्हाळुंगे घटनेत गोल्याळीतील चौघे जण सापडल्याने जांबोटी भागातील शिकारीचा संशय कर्नाटक वनखात्याकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे भविष्यात या भागातही कोणत्याही क्षणी छापा पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.