तालुकावासियांची हाक; आज नाही तर कधीच नाही! राज्यात 10 हजारहून अधिक कन्नड – इंग्रजी जागा भरून घेत असतांना मराठीवर अन्याय, वैयक्तिक, वाद विवाद, पक्षभेद विसरून मराठी’साठी एकत्र या….
-लोकहित विशेष न्यूज –
खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
गेल्या पन्ना वर्षांहून अधिक काळापासून बेळगांव – खानापूरसह मराठी बहुभाषिक सीमाभागात कर्नाटकाकडून जाणीवपूर्वक कन्नड सक्तीचा सपाटा आजही सुरूच आहे, सध्याच्या घडीला तर मराठीच्या मुळावरच कर्नाटकी घाव घातला असून, मराठी शाळा बंद पाडण्याचा जणू त्यांच्याकडून चंगच बांधला जात आहे. राज्यात कन्नड आणि इंग्रजी माध्यमातील 10 हजारहून शिक्षकांच्या जागा भरण्यात येत असतांना, मराठीला जाणीवपूर्क डावलले गेले आहे. मराठी जागा रिक्त नसल्याचे स्थानिक शिक्षण अधिकाऱ्यांकडून दाखवण्यात आले असून, मराठी शाळांची संख्या कमी करून मराठी संपवण्याचा डाव कर्नाटकी सरकारने आखला आहे. हीच वेळ आहे मराठीसाठी एकत्र येण्याची, आज नाही तर कधीच नाही! मराठी भाषिकांनो एकत्र या, आपली मायमराठी वाचवा अशाच हाका सर्वत्र ऐकू येताहेत. त्याला ‘ओ ‘देत पक्षभेद, वैयक्तिक वाद -विवाद बाजूला ठेवून मराठीसाठी लोकशाहीच्या मार्गाने आवाज उठवण्याची गरज आहे.
म. ए. समितीची भूमिका महत्वाची….
जिल्हा आणि तालुक्यात मराठीसाठी आजपर्यंत लढा देणाऱ्या मध्यवर्ती समिती आणि खानापूर तालुका समितीची भूमिका महत्वाची ठरणार आहे. अनेकवेळा अशा संकटाना समितीने लोकशाही मार्गाने लढा दिला असून, यावेळी मात्र, समितीची सत्वपरीक्षाच ठरणार आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये. युवा समितीचे अध्यक्ष समिती नेते शुभम शेळके यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याविरोधात मोठा लढा उभारून सरकारला जाब विचारण्यात येईल अशी माहिती दिली.
हजारो मराठी जागा रिक्त; शेकडो डीएडचे मराठी विद्यार्थी प्रतीक्षेत…
बेळगांव आणि खानापूर तालुक्यातील मराठी शाळांमध्ये हजारो मराठी शिक्षकांच्या जागा रिक्त असतांना स्थानिक अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक मराठी जागा खाली दाखवल्या नाहीत. त्यामुळे शकडो डीएड विद्यार्थांचे मोठे नुकसान होणार असून, भविष्यात मराठी भाषेचे प्रमाण कमी करण्याचा कर्नाटक शासनाचा प्रयत्न आहे, तो सर्वांनी मिळून लोकशाहीच्या मार्गाने हाणून पाडला पाहिजेत, अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
शासनाच्या निर्णयाविरोधात डीएड पदवीधारक उमेदवार घेणार अक्षेप; त्यांना हवे आमदार तालुक्यातील नागरिकांचे बळ…
मराठीला डावलून कन्नड आणि इंग्रजी माध्यमातील शिक्षक भरती निर्णयाविरोधात डीएड पदवीधारक विद्यार्थ्यांनी अक्षेप घेण्याचा निर्णय घेतला असून, शेकडो डीएड पदवीधारक विद्यार्थी काल बंगळूरला रवाना झाल्याचे वृत्त लोकहितला मिळाले आहे. त्या विद्यार्थांच्या लढ्याला आमदार विठ्ठल हलगेकर, तालुक्यातील सर्वपक्षीय नेते आणि नागरिकांचे बळ हवे आहे.
प्रतिक्रिया –
मराठी शिक्षक भरती संदर्भात सरकारला पत्र लिहिले असून, दोन दिवसात बंगळूरला सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हा विषय जोरदारपणे मांडू…
– आमदार- विठ्ठल हलगेकर.
मराठी जागांबाबत तालुका काँग्रेस तालुका वासियांच्या पाठीशी असेल, मराठी जागा भरून घेतल्या पाहिजे अशीच आमची भूमिका आहे..
–सुरेश जाधव, तालुका काँग्रेस नेते…
मराठीसाठी आम्हीं सदैव प्रयत्नशील आहोत, सर्वांना सोबत घेऊन आवाज उठवण्यात येईल.
संजय कुबल, जिल्हा भाजप उपाध्यक्ष, माजी तालुका भाजप अध्यक्ष..