खानापूर केएलई वाणिज्य महाविद्यालयात स्वागत समारंभात व्याख्यान; मान्यवरांची उपस्थिती..
खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
“महाविद्यालयीन जीवन हे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी भक्कम पाया असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातही सक्रिय सहभाग घेऊन शिस्त, परिश्रम आणि संवादकौशल्ये विकसित करावीत,” असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, व्याख्याते आणि कवी पिराजी कुऱ्हाडे यांनी केले.
के.एल.ई. सोसायटीच्या वाणिज्य महाविद्यालय, खानापूर येथे बी.कॉम. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. के.एल.ई. सोसायटीच्या बी.सी.ए. महाविद्यालयाचे प्राचार्य आनंद तवणशी आणि विजय पुजार हे मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना स्पष्ट ध्येय निश्चित करून महाविद्यालयातील विविध सुविधांचा योग्य लाभ घेण्याचा सल्ला दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य विजय एम. कलमठ होते. त्यांनी नवागत विद्यार्थ्यांचे के.एल.ई. परिवारात स्वागत करून शिक्षण, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात महाविद्यालयाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली.
यावेळी वाणिज्य विभागाचे विभागप्रमुख पी. जी. भातकांडे, सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख सोनिया नाईक तसेच प्राध्यापिका गुरुदेवी हिरेमठ, अश्विनी, सुनीता आणि अन्य प्राध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या निमित्ताने वरिष्ठ विद्यार्थ्यांनी गीत, नृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. नवागत विद्यार्थ्यांनी स्वतःची ओळख करून देत आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी निंगणगौडा पाटील यांनी आभार मानले. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समितीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
