आमदारांचे चोराच्या ‘उलट्या बोंबा’: तालुका काँग्रेसचा आरोप…


खानापुरात ब्लॉक काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत अनेक पदाधिकाऱ्यांकडून अनेक गोष्टींचा खुलासा…

खानापूर लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

      तालुक्यात विकासकामे, समस्या सोडवण्यास कमी पडलेल्या आमदार विठ्ठल हलगेकर यांनी मागच्यावेळी माजी आमदार डॉ अंजली निंबाळकर यांच्यावर केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर देताना तालुका ब्लॉक काँग्रेसने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे, आपण काहीच करायचे नाही वर आणि दुसऱ्यावरच आरोप करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्यासारखे आहे, असा आरोप नुकतेच खानापुरात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेत्यांनी आमदार हलगेकर यांच्यावर केला आहे. अडीच वर्षात नवीन कामे मंजूर करून आणली नसून, जुन्याच डॉ अंजली निंबाळकर यांच्या काळातील कामांची पूजा विद्यमान आमदार करत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

काय आहे हे प्रकरण; कोण काय म्हणाले…

     आमदार विठ्ठल हलगेकर यांनी एका ठिकाणी तालुक्याच्या विकासकामात माजी आमदार डॉ अंजली निंबाळकर यांनी आडकाठी आणत असल्याचा आरोप केला होता. राज्यात काँग्रेस सरकार असल्याने निंबाळकर यांचे चालत असल्याचे हलगेकर यांचे म्हणणे असेलही कदाचीत,  पण असे काहीच नसून ज्याकाळी डॉ.अंजली निंबाळकर यांनी स्वतः आमदार होत्या त्यावेळी राज्यात भाजपचे सरकार होते. तरीही त्यांनी तालुक्यात कोटींचा निधी आणून, बस स्थानक, सरकारी दवाखान्यासह पाणी, रस्ते अशा सर्व बाबतीत विकास केला आहे, हे तालुक्यातील जनतेसमोर आहे, असे प्रत्युत्तर तालुका ब्लॉक काँग्रेसकडून सदर पत्रकार परिषदेत देण्यात आले. तर त्याचप्रमाणे यावेळी तालुक्यात भाजपचा आमदार तर राज्यात सरकार काँग्रेसचे असे चित्र आहे, आमच्या आमदाराने विकास केला तसा तुम्हाला करायला काय अडचण आहे असा सवाल काँग्रेसकडून करण्यात येत आहे. शिवाय तालुक्याच्या विकासासाठी आम्हींही पाठिंबा देवू असेही काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून यावेळी जाहीर करण्यात आले.

    

मंजूर कामांना गती नाही, अद्याप केडीपी मीटिंग नाही..

आमदार स्वतः अकार्यक्षम असताना दुसऱ्यावर आरोप करणे कितपत योग्य आहे, तालुक्यात सर्वच सरकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची मनमानी वाढल्याने भ्रष्टाचार बोकाळला आहे, त्याला सामान्य जनता वैतागली आहे, असे असतांना यावर आमदार विठ्ठल हलगेकर यांचा थोडाही वचक राहिला नाही, काय म्हणावे याला? असा सवाल तालुका काँग्रेस नेते सुरेश जाधव यांनी केला.  श्री. जाधव पुढे म्हणाले की, 2023- 24 सालच्या एसएसडीपी योजनेतून लिंगणमठ रस्त्यासाठी पाच, हलशी नागरगाळी रस्त्यासाठी पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे, या दोन्हीं कामांची पूजाही झाली असून,  टेंडरही झाले आहे. याला आज अडीच वर्ष लोटले तरी अद्याप कामच सुरू नाहीं, अशा मनमानी कंत्राटदाराला ब्रेक देऊन दुसऱ्याला हे कंत्राट का देवू नये! असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पोलिस मस्तवाल, तहसीलमध्ये बोगस कामे, अंधाधुंद कारभार सुरू आहे, यावर कोण अंकुश लावणार ? शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेनाशी झाली आहे, यावर आमदार कधी आवाज उठवणार असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

अडीच वर्षात आमदारांनी विकास कामांचे किती नारळ फेडले: अँड ईश्वर घाडी ..

     आमदकीची निवडणूक होऊन अज तीन वर्षे होत आली तरी तालुक्यात विकास कुठे दिसेना. या काळात आमदारांनी किती विकासकामांचे नारळ फोडले, मुख्यमंत्री, संबंधित खात्याच्या मंत्र्यांची कितीवेळा भेट घेतली याचे उत्तर द्यावे असे काँग्रेसचे ग्रामीण अध्यक्ष ॲड. ईश्वर घाडी यांनी असे आव्हान दिले आहे. माजी आमदार डॉ अंजली निंबाळकर यांच्यावर उगाच खोटे आरोप न करता आपण दिलेल्या आश्वासनांची काय पूर्तता झाली याचे चिंता करा, असाही सल्ला घाडी यांनी दिला आहे.

    

कोणते कोणते मुद्दे मांडले काँग्रेस नेत्यांनी…

     – डीसीसी बँक निवडणुकीच्यावेळी तालुक्यातील कृषी पत्तीन सोसायट्यांना 25 लाखांचा निधी देणार असल्याचे सांगत, बिडी येथे त्या कामाची पूजाही आमदारांनी केली आहे, कुठे आहे निधी?

  • डॉ अंजली निंबाळकर यांच्या कालावधीत भाजपचे सरकार असतानाही त्यांनी तालुक्यात 900 कोटींचा निधी आणून, सरकारी दवाखाना उभारला, बस स्थानक उभारले. विद्यमान आमदारांनी किती निधी आणला?
  • राजा स्टाईल ते मराठा मंडळ कॉलेजपर्यंतच्या रस्त्यासाठी 14 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असला तरी ते काम आराखड्यानुसार होईना. अनेकवेळा निवेदन, तक्रार करूनही कोणतीच सुधारणा झालेली नाही. त्याकडे तुम्हीं आमदार म्हणून किती गांभीर्याने लक्ष देत आहात, याचे उत्तर द्यावे. या रस्त्यावर होणारे अतिक्रमणं कोणाचेही असो, ते काढलेच पाहिजे अशी आमची मागणी.
  • तालुक्यात बेकायदेशीर वाळू वाहतूक राजरोस सुरू आहे, त्यावर कोण नियंत्रण ठेवणार.
  • शिरोली ग्राम पंचायतीच्या निधीमध्ये 25 टक्के कमिशन मागणाऱ्या गुरुराज चरकी यांना कामावरुन निलंबित करून तेवढे चालणार नाही, त्यांच्यावर कारवाई  केली याचे उत्तर द्यावे. असे मुद्दे या पत्रकार परिषदेत उपस्थित केले. यावेळी तालुका पंचहमी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी, उत्तरचे काँग्रेस अध्यक्ष महंतेश राऊत, ग्रामीण महिला अध्यक्ष दीपा पाटील, उत्तरच्या सावित्री मादार , लक्ष्मण मादार, नगरसेवक तोहीब चंडनावर, जोतिबा शिवंनगेकर, पराशराम लाड आदी नेते उपस्थित होते.


काँग्रेस नेते महादेव कोळी बोलतांना…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *