तालुक्यांतील समस्या सोडवा; तालुका म. ए समिती अक्रमक…


ग्रेड टू तहसीलदार राकेश बुवा यांना निवेदन सादर; काँग्रेस -भाजपच्या रेटारेटीत तालुक्याचा विकास मात्र,खुंटला…

खानापूर : लोकहित न्यूज

      खानापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बहुतेक गावच्या रस्त्यांची दैना उडाली आहे, असोगा -खानापूर रस्ता बंद होण्याच्या मार्गावर, कुसमळी पुलावरून वाहतूक बंद ठेवण्यात आल्याने चोर्ला मार्गावरील वाहतूक खानापूर -जांबोटी आणि बैलूर व्हाया देवाचीहट्टी – जांबोटी रस्त्यांनी वळविण्यात आल्याने या दोन्हीं रस्त्यांवर डबकी साचली आहेत. परिणामी दुचाकी चालणे कठीण झाले आहे, असे असताना तालुका बांधकाम खात्याचे अधिकारी मूग गिळून गप्प बसले आहेत का? , तालुक्याचा पश्र्चिम भागासह तालुक्याचा विविध भागात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे, या समस्या सबंधित खात्याने तत्काळ सोडवाव्यात शिवाय खानापूर तालुका 75 टक्क्याहून मराठी भाषिक असताना अद्याप तालुका सरकारी दवाखान्याच्या फलकावर मराठी फलक लावण्यात आला नाही. तो तत्काळ लावला पाहिजेत. तसेच मुसळधार पावसामुळे तालुक्याचा अनेक ठिकाणी घरांची पडझड झालेली असून, शेतीपिकांचीही नुकसान झाली आहे, याचाही पंचनामा करून सबंधित नुकसानग्रस्तांना त्वरित भरपाई शासनाने मिळवून द्यावी या मागण्यांचे निवेदन तालुका म. ए.समितीच्यावतीने माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रेड टू तहसीलदार राकेश बुवा यांना सादर करण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई, म. ए. समिती सरचिटणीस आबासाहेब दळवी, मा. तालुका पंचायत सदस्य पांडूरंग सावंत, गोपाळ पाटील , वसंत नावलकर, अजित पाटील, डी. एस भोसले, भीमसेन करंबळकर, संजीव पाटील, राजाराम देसाई, कृष्णा कुंभार, ब्रम्हानंद पाटील, म्हात्रू धबाले, माऱ्याप्पा पाटील, सुधीर, नावलकर आदी उपस्थित होते.

….. अखेर म. समितीला आली जाग; तालुक्यांतील समस्यांसाठी आक्रमक भूमिका घेण्याची गरज…

     राज्यात काँग्रेसचे सरकार तर तालुक्यात भाजपचे आमदार असा विरोधी सूर असल्यामुळे तालुक्याच्या विकासाची गती मंदावल्याचे चित्रं आहे. रस्त्यांची समस्या तर इतकी गंभीर बनली आहे की, नागरिकांनी प्रवास करावा की नको असा अशी परिस्थिती आहे.  शिवाय अनेक समस्यांनी तालुक्याला ग्रासले असताना आमदार सांगतात, सरकारच्या पंच हमी योजनांमुळे निधी मिळेना तर दुसरीकडे सरकार विकास कामांचा गवगवा करतांना दिसत आहे. दोन्हीं कडील रेटारेटीत सामान्य जनता मात्र, भरडली जात असून, समस्या कोण सोडविणार? असा प्रश्न आहे. त्यामुळे तालुक्याला वाली कोण? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. यापूर्वी समिती आमदार असल्याने विकास होत नाहीं अशी बोंब ऐकू येत होती. अलीकडच्या काळात  पक्षाचेच आमदार निवडून आल्याने कधी ‘गती तर ब्रेक’ अशी तालुक्यातील विकास कामांचे चित्रं आहे. तालुक्यांतील खराब रस्त्यांवर खडी टाकणेही बांधकाम खात्याला जमले नाही. त्यामुळें रस्त्यांची समस्या कोण दूर करणार? अशा विवंचनेत जनता सापडली आहे. आता तालुका म. ए समितीने आक्रमक भूमिका घेण्याची गरज असल्याचे मत नागरिकांतून ऐकू येत आहे.

प्रतिक्रिया –

   तालुक्यांतील समस्यांसाठी आम्हीं नेहमीच आवाज उठविला आहे, यापुढेही उठवू. सरकारने तालुक्यातील समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी आमची मागणी आहे.

  • दिगंबर पाटील, माजी आमदार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *