आमदार, खासदारांनी तात्काळ पाठपुरावा करण्याची गरज; टोल कंपनीकडून दमदाटी…
खानापूर : लोकहित न्यूज ( विलास कवठणकर)
किमान वेतन देण्याच्या मागणीसाठी खानापूर बेळगांव महामार्गावरील गणेबैल टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी आंदोलन छेडले होते, त्यांच्या मागणीची पूर्तता तर सोडाच त्यांना कामावरुन काढून टाकत टोल कंपनीने दमदाटीपणा चालवला आहे. आंदोलकांमध्ये जास्ती जास्त स्थानिक मुलांचा समावेश असल्याने भूमिपत्रांवर अन्याय का? असा संतप्त सवाल तालुक्यातील जनता करत असून, आमदार विठ्ठल हलगेकर व खासदार विश्वेश्वर हेगडे यांनी तात्काळ ही समस्या सोडवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. भूमिपत्रांवर अन्याय होवू देणार नाही या आश्वासनावर तालुक्यात भाजपने सत्ता मिळवली आहे, आता प्रत्यक्षात स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय होत असताना भाजप मंडळी गप्प का? असा प्रश्न काँग्रेस नेते सुरेश जाधव यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना केला आहे.
नियमानुसार किमान वेतन देणे अनिवार्य; तरीही टोल कंपनीची दादागिरी का?..
शासनाच्या नियमानुसार कर्मचाऱ्यांना किमान वेतन देणे गरजेचे आहे, असे असतांना टोल कंपनीची कर्मचाऱ्यांवर दमदाटी का? मागच्यावेळी काँग्रेससह स्थानिक शेतकरी व नागरिकांनी आंदोलन पुकारून गणेबैल टोल नाका बंद पाडला होता, जिल्हाधिकारी आणि आमदारांनी मध्यस्थी करून पुन्हा तो सुरू केला होता. काहीं दिवसांपासून येथील कर्मचाऱ्यांची किमान वेतन देण्याची मागणी आहे, त्याकडे टोल कंपनीने दुर्लक्ष केल्याने त्यांना आंदोलन करावे लागले. तरीही त्यांची मागणी मान्य करायचे सोडून टोल कंपनीने आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करून तत्काळ पर्यायी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्यामुळे स्थानीक भूमिपुत्रांना वाली कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे..
प्रतिक्रिया
मला याची कल्पना नाही, आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तरी कळवायला पाहिजे होते. मी सध्या बंगळूर अधिवेशनामध्ये आहे, लवकरच खानापूरला येणार आहे, या समस्येचा पाठपुरावा करण्यात येईल..
–विठ्ठल हलगेकर, आमदार…






Leave a Reply