स्वतःच्या चैनीसाठीच ‘धरला’ चोरीचा मार्ग ; एकटा तर गोवा कॅसिनो ‘सट्टयात’ कोटीत बुडाला!


बैलूर, चापगाव, कालमणीसह तालुक्यात चोरी प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात सापडलेल्या त्या तिघा चोरट्यांची कहाणी; लॅपटॉप, सीसीटीव्ही डीव्हीआरसह चोरी केलेल्या वस्तू जंगल, नदीत फेकून दिल्या, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू...

  

लोकहित न्यूज:  विलास कवठणकर ( क्राईम स्टोरी)

       वाघाला जशी रक्ताची चटक लागली की, तो त्याच दिशेने पळतो. त्याप्रमाणे व्यक्तिलाही एखाद्या गोष्टीची, कामाची सवय लागली की, तोही त्यामध्ये वेडा होऊन जातो. तीच गत गेल्या आठवड्यात कालमनी, बैलूर आणि चापगावसह यापूर्वी तालुक्यात लहान मोठ्या चोऱ्यांच्या आरोपाखाली सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या त्या तिघांची होवून बसली आहे. चैनीसाठीच त्यांनी आतापर्यंत तालुक्यात सहाहून अधिक ठिकाणी चोऱ्या केल्याची माहिती चौकशीत समोर येत आहे. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे हे तिघेही तिशीच्या आतील तरुण आहेत, परिणामी एवढया कमी वयात खाकीच्या कचाट्यात अडकल्याने पुढच्या आयुष्याचे काय? गुन्हे सिद्ध झाल्यानंतर काळकोठडितच काहीं काळ  सडावे लागेल….

एकटा तर गोवा कॅसिनोच्या सट्टयात पुरता बुडाला अन् पक्का चोर झाला….

      मागच्या महिन्यात गोव्यातील दोन कॅसिनो आगीत जळून भस्मसात झाल्याचे वृत्त देशभर पसरले होते, त्याच कॅशिनोमुळे जास्त लोक अडचणीत आले आहेत तर काहीं जण सावरलेही आहेत. त्याच कॅसिनोच्या कोटींच्या सट्ट्यात अडकलेला एकटा पोलिसांच्या ताब्यात सापडला आहे. सट्ट्यामध्ये बुडाल्यामुळे त्याने घर दर विकून चोरीचा मार्ग धरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे एखादा नाद काय असतो हे यावरून स्पष्ट होते.

काहीं जंगलात तर काहीं नदीत चोरलेल्या वस्तू दिल्या फेकून; त्यांचा शोध सुरू…

    पैसे असतील तर ते सट्टा आणि चैनीसाठी वापर त्याचवेळी चोरलेल्या इतर वस्तू नदीत आणि जंगलात चोरट्यांनी फेकून दिल्या आहेत. पोलिस तपासासाठी त्या वस्तू आवश्यक असल्याने त्यांचा त्या त्या ठिकाणी चोरट्यांना नेवून तपास केला जात आहे.

व्यवसाय,धंदा नसल्यानेच तरुण वर्ग गुन्हेगार बनतो काय?…

      तालुक्यात सुशिक्षित बेकरांचीही संख्या कमी नाही. वाळू,वीट आणि पारंपरिक शेती व्यवसायाव्यतिरिक्त तालुक्यात दुसरा पर्यायच उपलब्ध नाही. सरकारकडून थोडा आर्थिक दिलासा मिळतो आहे, तरुणांनीही वेगवेगळे व्यवसाय, कामात गुंतून राहणे गरजेचे आहे. चैनीसाठी गुन्हेगारी मार्ग धरणे म्हणजे भविष्य वाया घालणे आहे. याचे चिंतन सर्वांनी करणे गरजेचे बनले आहे…

लवकरच चोरी प्रकरणांचा छडा लागणार; पोलिस…

      तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे पोलिसही चक्रावले आहेत. बैलूर गावकऱ्यांच्या सतर्कतेने चोरीच्या वेळी एकटा सापडल्याने पोलिस तपासाला गती आली असून, लवकरच या प्रकरणांचा छडा लागणार असल्याची माहिती पोलिसांनी लोकहित न्यूज शी बोलतांना दिली..

प्रतिक्रिया-

   मौजमजेसाठी तरुणांनी आयुष्य वाया घालवू नये, दुनिया खूप मोठी आहे. विविध व्यवसाय थाटून आयुष्य सुखमय करावे, गुन्हेगारीत सापडणे म्हणजे जन्म व्यर्थ जाणे असेच म्हणावे लागेल. मी तालुक्यात युवकांसाठी वाणिज्य आणि उद्योग व्यवसाय थाटून 2500 नोकऱ्या उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करत आहे.

  –  प्रसाद पाटील, ग्राम पंचायत सदस्य गर्लगुंजी.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *