सरकारचा अजब कारभार-  मतदार रामापूर पेठेतले; नावे मात्र, जांबोटी राजवाडा यादीवर…


प्रभाग दोनच्या नागरिकांचे तहसीलदारांना निवेदन; आणखी दोन सदस्य संख्या वाढवण्याची मागणी…

     

विलास कवठणकर: खानापूर लोकहित न्यूज..

आधीच विकास खुंटलेला , रस्ते, पाण्यासह मुलभूत सुविधांची वानवा. अनेकवेळा मागणी करूनही वेळेत पूर्तता नाही, मुळात लोकसंख्या 1200 च्या घरात असतांनाही दोनच सदस्य त्यात सरकारच्या चुकीमुळे मतदारांची बदला -बदल , ती अशी की, मतदार रामापूरपेठेतील (जांबोटी) आणि नावे मात्र, जांबोटी राजवाडा मतदार यादीवर पडल्याने क्रमांक 2 च्या नागरीकांना जणू वणववासच भोगावा लागत आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अशा या सरकारी आंधळ्या कारभारामुळे सतावून गेलेल्या वार्ड नागरिकांनी थेट तहसिलदार कार्यालय गाठत मतदार यादी सुरळीत करतांनाच, लोकसंख्येनुसार शिवाय विकास साधण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीआधी आणखी दोन ग्राम पंचायत सदस्य संख्या वाढवून देण्याची मागणी तहसीलदारांकडे निवेदनाव्दारे केली आहे. त्यामुळे सरकार आता तरी जागे होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

काय आहे लोकांची मागणी…. सरकार काय करू शकते…

     जांबोटी रामापूर ही जांबोटीची प्रसिद्ध गल्ली जांबोटी पंचायतीच्या 2 नंबर वार्डमध्ये येते. मात्र, त्यामानाने याठिकाणी म्हणावा तसा विकास झालेला नाही. पाण्याची, गटारसह विविध नागरी समस्यांची कायमच वानवा ठरलेलीच! या वार्डात एकूण 1200 लोकसंख्या असताना दोनच मेंबर कार्यरत आहेत, सरकारच्या चुकीमुळे या वॉर्डातील मतदारांची नावे जांबोटी राजवाडा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. समस्या सोडवण्यासाठी नागरिकांनी अनेकवेळा मागणी करूनही कोणतीच दखल घेतली जात नाही, त्यात लोकसंख्येनुसार ग्राम पंचायत सदस्य संख्या केवळ दोनच असल्यामुळे विकास नागरी विकास होणे कठीण होवून बसले आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून ही समस्या असतानाही पंचायत वा सरकारने याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे, आता तरी तात्काळ मतदार यादीत दुरुस्ती करून, दोन सदस्यांची संख्याही वाढवण्यात यावी अशी मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. तर आणखी दोन महिन्यानंतर ग्राम पंचायतीची निवडणूक होणार आहे, त्याआधी सरकारला नागरिकांच्या दोन्हीं मागण्यांची पूर्तता करता येते, त्यासाठी नागरिकांनी या काळात वारंवार पाठपुरावा करण्याची गरज आहे..

..निवेदन देतेवेळी बहुसंख्य नागरीक होते हजर…

      सदर निवेदन देतेवेळी विद्यमान ग्राम पंचायत सदस्य मंजुनाथ मुतगी, मारूती हळब, मिथून कुंभार, दर्शन नाईक, दौलत कोलीकर, सचिन कुडतुरकर, प्रकाश ओवुळकर, मोहन किनारी, आनंद डम्ब्लकर, रवी पिळणकर, मंजुनाथ डांगे, वैभव ओवूळकर, विक्रम बिर्जे, रोहित वेताळ, सचिन पेडणेकर, आनंद सुत्तार यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

   

       

    


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *