
खानापुरात मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या पुढाकाराने माय मराठी भाषा दिन मोठ्या दिमाखात साजरा; सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती…
खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
जन्मताच मुलाला बोलायला शिकवते तीच मातृभाषा आहे, मातृभाषेशी बुद्धिमत्तेचा जवळून संबंध आहे. भावना संपल्या की, माणसातील माणूसपण जाऊन जनावरातील वृत्ती आत्मसात होते, त्यामुळे मातृभाषा प्रत्येकासाठी फार महत्वाची असून, देशातील 94 टक्के लोक शास्त्रज्ञ मातृभाषेतूनच झाले आहेत, असे मत इस्लामपूरचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांनी मांडले. मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान व राज्य मराठी विकास संस्थेच्या पुढाकाराने खानापुरात माय मराठी भाषा दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर होते. सहसचिव प्रल्हाद मादार यांनी स्वागत केले.
व्यासपीठावर माजी आमदार दिगंबर पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई, म.ए समिती कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, राज्य भाजप कार्यकारिणी सदस्य प्रमोद कोचेरी,माजी तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल, लैला शुगर्सचे एमडी सदानंद पाटील, खानापूर बँकेचे अध्यक्ष अमृत शेलार, श्रीराम सेनेचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी, यशवंत बिर्जे, निरंजन सरदेसाई, म.ए.समिती नेते प्रकाश चव्हाण, गर्लगुंजी पीकेपीएसचे माजी अध्यक्ष राजू सिद्धानी, तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमानी पाटील, शिवस्वराज्य संघटनेचे उपाध्यक्ष रमेश धबाले, प्रा.डॉ.आर. एम गुरव, ताराराणी हायस्कूलचे मुख्याध्यापक राहुल जाधव, डी. एम. भोसले, अनंत पाटील, मिलग्रीस चर्च शाळा सुधारणा कमिटी अध्यक्ष दीपक कोडचवाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना, प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार म्हणाले, गुलामगिरी थोपविण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण महत्वाचे असून, देशात बहूतेक लोक आपल्या मातृभाषेतून शिकून शास्त्रज्ञ झाले. आजच्या युवकांच्या डोळ्यात उद्याचे स्वप्न काम शिक्षण करते, ते ज्ञान अनुभवाने लाभते, असे आधीच संत ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे. मातृभाषा ही कामगार कष्टकऱ्यांमुळे टिकून असून, ही माणसं संपली की, भाषाही संपते. जगात इंग्रजी भाषा कमी बोलली जात असतानाही तिचा अट्टाहास कशासाठी? याउलट तुम्हीं मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने स्वतःचा आत्मविश्वास वाढतो, मातृभाषेतील कवींनी क्रांती केली असून, अनेकांना जीवन संपवण्यापासून परावृत केले आहे. खानापूर बेळगांव सीमाभागात माय मराठी येथील लढावू माणसांमुळे टिकून राहिली आहे. परकीय भाषेतून मुलांमध्ये निर्माण न्यूनगंड हा धोकादायक ठरू शकतो असेही ते म्हणाले. यावेळी दिगंबर पाटील, सदानंद पाटील, अँड ईश्वर घाडी, मुरलीधर पाटील, प्रमोद कोचेरी, निरंजन सरदेसाई आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान मराठीसाठी सदैव तत्पर राहील: नारायण कापोलकर…
मराठी भाषेसाठीच मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचा प्रवास सुरू असून, मराठीसाठी सदैव आम्हीं तत्पर राहू, असे सांगतानाच यापुढेही मराठी संवर्धनासाठी नवनवे उपक्रम हाती घेण्यात येतील अशी हमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर यांनी यावेळी बोलतांना दिली. यावेळी प्रभावी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद पाटील आणि शिक्षक शिवाजी हसणेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी विशेष म्हणजे मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध सामान्यज्ञान स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.. यावेळी प्रतिष्ठानचे सचिव वासुदेव चौगुले यांनी सूत्रसंचालन केले तर प्रतिष्ठानचे खजिनदार ईश्वर बोबाटे यांनी आभार मानले…






Leave a Reply