
ग्राम पंचायतींना फंड वाढीसह मिळणार अधिकच महत्व; ऑगस्ट – सप्टेंबर महिन्यात निवडणूक प्रक्रिया पार पडून ऑक्टोबरमध्ये होणार निवडणुका!
बंगळूर/ बेळगांव लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बऱ्याच लांबणीवर पडल्या होत्या, त्याबद्दल सरकार आणि निवडणूक आयोगाची तयारी नसल्याने जिल्हा पंचायत व तालुका पंचायतीचा कार्यकाळ संपूनही पाच वर्षे अधिक झाली आहेत, त्यामुळे ही दोन्हीं पदे रद्द होवून यांचाही संपूर्ण अधिकार ग्राम पंचायतीला देणार का? अशीही चर्चा सुरू होती. मात्र, एकाच संस्थेला अधिक अधिकार दिला तर विकासाच्यादृष्टीने आवाक्याच्या बाहेर होईल, यामुळे तो निर्णय सरकारने मागे घेत, जिल्हा पंचायत व तालुका पंचायत पद कायम ठेवत या दोन्हीं पदांबरोबर ग्राम पंचायत निवडणुकही एकदाच घेण्याचा कार्यक्रम सरकारने आखला असून, गावपळीवर पूर्णपणे विकास साधण्याच्या उद्देशाने पंचायत वॉर्डही वाढवण्यात आले आहेत, तर सध्या गावपातळीवर नागरिक (निवडणूक) गणती (SIR) सुरू असून, ती लवकरच संपणार आहे, त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर मधील 45 दिवसांत निवडणूक प्रक्रिया अर्थात सरकारी काम पूर्ण करून तसा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येऊन, ऑक्टोंबर अखेर ग्राम पंचायत, जिल्हा पंचायत व तालुका पंचायत निवडणुका पार पडतील अशी, माहिती ग्राम विकास मंत्री ईश्वर यांनी यांनी दोन दिवसांपूर्वी बंगळुरात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, सध्या ग्राम पंचायतींवरील सदस्यांचा अधिकार संपला असून, प्रशासकाच्या हातून पंचायत कारभार सुरु आहे, तर जिल्हा आणि तालुका पंचायतीचा पाच वर्षांचा कार्यकाळ वाया गेला आहे, त्यामुळे या पातळीवरील विकास खुंटला आहे, त्यामुळे सरकारने गंभीर होवून ऑक्टोंबरमध्येच निवडणुकांचा कार्यक्रम आखला आहे.
..आता गावागावात येणार राजकीय राजकारण रंग…
एरवी एकमेकापासून दूर, वैयक्तिक वादविवादाने ताटातूट झालेले गाव पुढारी आपली ‘डाळ’ शिजवून घेण्यास आधीपासूनच कामाला लागले आहेत, आता तर आरक्षण आणि निवडणुकांची तारीख जाहीर झाल्याने गावागावातील राजकारणाला अधिकच रंग येणार आहे. बैलूर ग्राम पंचायतीसह जिल्ह्यातील पंचायतींच्या वॉर्ड संख्येत वाढ झाल्याने ‘व्यक्ती’वर हे राजकारण रंगेल असे चित्र आहे.
