जांबोटी राजवाडा रस्त्याची कहाणी; आमदारसाहेब बघा हिकडे जरा!
जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
सरकारकडून नवीन रस्ता मंजूर, इतका निधी मंजूर असल्याच्या घोषणेने आमदार विठ्ठल हलगेकर यांनी रस्त्याची पूजा केली, त्यानंतर काहीं दिवस काम चाललेही. रस्ता सपाटीकरण करून दोन्हीं बाजूच्या गटारींचे कामही करण्यात आले. मात्र, त्यानंतर तब्बल तीन महिने हे काम बंदच पडले असून, कॉन्ट्रॅक्टर अर्धवट काम सोडून पळून गेल्याची जोरदार चर्चा नागरिकात रंगली आहे. परिणामी सपाट केलेल्या रस्त्यावर खडी, लहान खडे आणि खड्डे पडल्याने अपघाताचे प्रकार सुरू असून, गेल्या चार दिवसापूर्वी एक जण पडून हाताला दुखापत झाली आहे. त्यामुळे गावातील युवकांवर ते खड्डे भरण्याची वेळ आली. आज युवकांनी सदर खड्डे भरले, त्यामुळे सरकार काय करते? असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
सरकारी रस्ता, खड्डे भरतात नागरिक; सरकार आहे कुठे?….
सरकारी मंजूर रस्ता, लाखों रुपये मंजूर झाले म्हणून सांगण्यात येते, थोडे दिवस काम चालते आणि बंद पडते काय म्हणावे या कारभाराला! निधी संपला म्हणायचा, कॉन्ट्रॅक्टर पैसे काढून घेऊन पळाला म्हणायचे की, सरकारकडे पैसेच नाही म्हणायचे असे अनेक प्रश्न नागरिकांतून विचारले जात आहेत. परिणामी सपाट केलेल्या रस्त्यावर पडलेले खडे, पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात घडत आहेत, त्यामुळे आधी होता तोच रस्ता बरा असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. आणखी दोन महिने या रस्त्याचे काम रेंगाळले तर पावसात तर मोठ्या समस्येला तोंड देण्याची वेळ प्रवाशांवर येण्याची भीती आहे. आज जांबोटी राजवाड्यातील युवकांनी पडलेले खड्डे भरले. यावेळी शुभम सडेकर, सागर कळेकर, ओंकार नेसरेकर, अभिषेक गुरव, अनिकेत गुरव, ज्ञानेश्वर पाटील, आशिष देसाई, सोमनाथ जांबोटकर, इंद्रजीत सडेकर, अभिजित शिंदे, केतन गुरव, मिलिंद शिंदे, संकेत जांबोटकर, आर्यन सडेकर या युवकांनी खड्डे भरले.


जांबोटीतील पुढारी कुठे आहेत??? फक्त इलेक्शनपुरता बाहेर पडतात काय?….
कोणतेही इलेक्शन असो, किंवा तालुक्याचे नेते गावात आले की, नागरिकांसमोर पुढे पुढे मिरवणारे पुढारी आता कुठे आहेत? गावच्या रस्त्याचे काम अर्धवट असताना स्थानिक पुढारी मूग गिळून गप्प का?… त्यांना याच काहीच सोयसुतक नाही का?… आता जनतेनेच या सर्वांना धडा शिकवण्याची गरज आहे…. जनता एवढी शहाणी होईल का?.. असाही प्रश्न उपस्थित होतो आहे…






Leave a Reply