अंगणवाडी क्र.2 ला लागूनच घाणीचे साम्राज्य; निवेदन देवूनही आमटे पंचायतीची डोळेझाक..
जांबोटी: लोकहित न्यूज
गावपातळीवर विकास करणे, नागरीकांच्या हक्काचे रक्षण करतानाच त्यांच्या समस्यां सोडवणे,त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला न्याय देणे ही कामगिरी पार पाडणारी स्थानिक सरकारी व्यवस्था म्हणून ग्राम पंचायतीची ओळख आहे, पण, ही ग्राम पंचायत लहान मुलांच्या जीवाशी खेळत असेल तर! अशीच घटना आमटे गावात घडली आहे. आमटे ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या आमटे गावातील क्रमांक -2 च्या अंगणवाडीजवळ तेही ग्राम पंचायतीच्या राखीव गावठाणमध्ये अतिक्रमण करत चक्क शेणाचे ढीग रचण्यात आले असून, त्यातून उत्पत्ती होणाऱ्या डासांसारख्या धोकादायक किटाणूंची पैदास वाढली आहे. परिणामी लहानग्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यात घाण वासेमुळे मुलांना जेवतांना कंटाळा येत आहे. असे असताना ही समस्या सोडवावी म्हणून ग्राम पंचायतीला नागरिकांनी अनेकवेळा निवेदने, पूर्वकल्पना देवूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. काय म्हणावे या कारभाराला? जनतेचे रक्षण की, भक्षण?… अशा आरोप नागरिकांतून होत आहे.
गेल्या आठवड्यात स्थानिक नागरिकांनी या समस्येबाबत निवेदन दिले आहे, शिवाय लहान मुलांच्या आरोग्याबाबत होणाऱ्या परिणामांची कल्पनाही पंचायत पीडीओ एम.एस मोकाशी आणि पंचायत कमिटीला देण्यात आली आहे . मात्र, त्यांनी याकडे डोळेझाकपणा केला आहे, अशी माहिती नागरिकांनी लोकहित न्यूज शी बोलताना दिली. पंचायतीला दिलेल्या निवेदनावर सागर गांवकर, भरत गांवकर, राजू गांवकर, अंकुश गांवकर, शिवाजी गांवकर, विष्णू सावंत, विलास गांवकर, रमेश गांवकर, देविदास गांवकर, वैशाली गांवकर आदी नागरीकांच्या सह्या आहेत.
…..पंचायतीच्या गावठाणमध्ये अतिक्रमण कुणाच्या आशीर्वादाने ?
आमटे गावातील क्रमांक – 2 च्या अंगणवाडी जवळील पंचायतीच्या मालकीच्या गावठाणमध्ये काहींनी अतिक्रमण करत शेणाचे ढीग लावले आहेत, मुळात या लोकांना ही जागा दिली कोणी? यामागे कुणाचा आशीर्वाद आहे असा प्रश्न सामान्य नागरिकांतून विचारण्यात येत आहे. ज्यांच्याकडे जागा नाही अशा गरजू नागरीकांना पंचायतीच्या राखीव गावठाण जागेतील जागा द्या असा शासनाचा आदेश आहे. मात्र, बहुतेक ठिकाणी याउलट परिस्थिती आहे, तेच उदाहरण आमटे गावात दिसत आहे. याची आता तरी कोण? दखल घेणार की, नागरिकांना तालुका जिल्ह्यापर्यंत जावे लागेल असा सवाल उपस्थित केला जात आहे.. याबाबत ग्राम पंचायतीकडे विचारले असता, लवकरच करवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

..त्या पंचायत गावठाण जागेत ‘चिल्ड्रन्स पार्क ‘ ची व्यवस्था करा..
आमटे अंगणवाडी क्रमांक -2 बाजुला म्हणजेच शेणाचे ढीग असलेल्या ठिकाणच्या त्या पंचायत गावठाण जागेत लहान मुलांसाठी चिल्ड्रन्स पार्क ची व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. याची ग्राम पंचायतीने दखल घेण्याची गरज आहे..
प्रतिक्रीया –
सदर अंगणवाडी जवळच शेणाचे ढीग लावल्याने त्यातून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मुलांच्या जीवाशी खेळ केला जात आहे का? सदर गावठाण मध्ये अतिक्रमण झाले असून, ते हटवून त्या ठिकाणी चिल्ड्रन्स पार्क ची व्यवस्था करावी अशी आमची मागणी आहे..
–सागर गांवकर, युवा सामाजिक कार्यकर्ते आमटे..






Leave a Reply