खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी गोवा आणि गुलबर्गा सायन्स सेंटरद्वारे “सायन्स ऑन व्हील” विज्ञान प्रयोगाची कणकुंबीपासून  सुरुवात                                  कणकुंबी : लोकहित न्यूज

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन व मनोभाव निर्माण होण्यासाठी तसेच विज्ञान प्रयोगांचा अनुभव मिळावा यासाठी शाळा कॉलेजमध्ये  गोवा सायन्स सेंटर व गुलबर्गा सायन्स सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला हा सायन्स ऑन व्हील्स हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी यांचा उपयोग करून घेतला पाहिजे असे मत खानापूर तालुका क्षेत्र शिक्षणाधिकारी पी रामाप्पा यांनी व्यक्त केले.
  पी रामाप्पा हे कणकुंबी येथील श्री माऊली विद्यालयाच्या सभागृहात गोवा सायन्स सेंटरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सायन्स ऑन व्हील्स या उपक्रमाच्या उद्घाटन समारंभात बोलताना व्यक्त केले.गोवा सायन्स सेंटर व गुलबर्गा सायन्स सेंटरद्वारे खानापूर तालुक्यातील चौदा हायस्कूलमध्ये हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार असून त्याचा उद्घाटन समारंभ कणकुंबी हायस्कूलमध्ये सोमवारी पार पडला.अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विजय नंदिहळ्ळी होते.
प्रारंभी मुख्याध्यापक एस जी चिगुळकर यांनी प्रास्ताविक भाषणात सांगितले की ग्रामीण भागातील परिसरात विद्यार्थ्यांना विज्ञान प्रयोग पाहण्याची व हाताळण्याची संधी मिळावी तसेच त्यासंबंधी तज्ञाकडून मार्गदर्शन मिळावे व विज्ञानाचा प्रसार आणि प्रचार व्हावा या हेतूने गोवा सायन्स सेंटरद्वारे हा उपक्रम राबविण्यात येत आहे.त्यासाठी खानापूर तालुक्यातील चौदा शाळांनी दिड दोन महिन्यांपूर्वी ऑनलाईन नोंदणी केली होती.त्यानुसार गोवा सायन्स सेंटरचे उपक्रम समन्वय व सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर यांच्या मार्गदर्शनाखाली खानापूर तालुक्यातील
चौदा हायस्कूलमध्ये सोमवारपासून सुरुवात झाली आहे.हा उपक्रम दि.३ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. असे सांगून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.यावेळी उपस्थित मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.उद्योजक बबन गावडे यांच्या हस्ते सरस्वती पूजन झाले.
यावेळी बीईओ पी रामाप्पा व बीआरसी म्हणून रुजू झालेले एम.जी.हती यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी शिक्षण संयोजक संतोष नाईक व शंकर कम्मार,गोल्याळी हायस्कूलचे मुख्या.के.एन.मन्नोळकर, साळुंखे,एस.डी.मुल्ला व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी गोवा सायन्स सेंटरचे भूषण राऊत यांनी मराठी मधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच गुलबर्गा सायन्स सेंटरचे अंबराया बेलमगी व लक्ष्मीकांत जमादार यांनी देखील माहिती सांगितली.यावेळी संतोष नाईक, विजय नंदिहळ्ळी, बबन गावडे यांनी शालेय स्तरावर विज्ञान किती महत्त्वाचे आहे हे पटवून दिले.
      ‌हा उपक्रम खानापूर तालुक्यामध्ये एक महिना चालणार आहे.या ग्रुपमध्ये खानापूर तालुक्यातील चौदा माध्यमिक शाळांनी मोबाईल सायन्स सेंटर (MSC) साठी नोंदणी केली आहे.त्या चौदा शाळांना या उपक्रमाद्वारे सायन्स सेंटरची बस येणार असून ती प्रत्येक शाळेच्या आवारात दोन दिवस मुक्कामाला असेल. त्यात अनेक प्रयोगांची मांडणी केलेली असून त्यासंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी  मराठी, कन्नड,हिंदी,इंग्लिश या सर्व भाषा अवगत असलेले तज्ञ आहेत.हा संपूर्ण उपक्रम मोफत असून बस सोबत येणाऱ्या मार्गदर्शकांची राहण्याची व्यवस्था संबंधित शाळेने करणे आवश्यक आहे.या उपक्रमांमध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबरच परिसरातील जवळ असलेल्या माध्यमिक किंवा उच्च प्राथमिक (पाचवी ते सातवी) शाळेतील विद्यार्थ्यांना प्रयोग हाताळण्यासाठी संधी मिळत आहे.ग्रामीण भागातील शाळांमध्ये स्वतंत्र प्रयोगशाळा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या विविध प्रयोगांपासून वंचित राहावे लागत असल्याने सदर उपक्रम उपयुक्त आहे.याचा लाभ चौदा शाळांतील विद्यार्थ्यांना होणार आहे. उपक्रमात सहभागी शाळांना पुढील काळात वेगवेगळ्या एनजीओकडून मिनी सायन सेंटर मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून सदर शाळेतील उपक्रमशील विज्ञान शिक्षकांचे गोवा,महाराष्ट्र व कर्नाटक असे ‘इंटरस्टेट फोरम’ करून त्यासाठी विशेष प्रशिक्षण पणजी येथील गोवा सायन्स सेंटर येथे घेण्याचे नियोजित आहे.तरी खानापूर तालुक्यातील माध्यमिक शाळांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन उपक्रम समन्वयक पी.जी.काकतकर यांनी केले आहे.
सुत्रसंचलन एन.एस.करंबळकर यांनी केले तर विज्ञान शिक्षिका शामल भरणकर यांनी आभार मानले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Prev :