चोर्ला गावाला सुरू केली स्पेशल बससेवा; आजपासून शुभारंभ!
तालीकोटी यांनी दिलेला शब्द पाळला; जांबोटी पश्चिम भागातील समस्यांवर नेहमीच पुढे राहणारे नेतृत्व!
चोर्ला : लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
खानापूर ते चोर्ला अशी विशेष बससेवा समाजसेवक इरफान तालीकोटी यांच्या प्रयत्नातून आजपासून सुरू झाली. या बससेवेमुळे चोर्ला परिसरातील नागरिकांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण झाली असून, गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
खानापूर येथून सकाळी ७.३० वाजता बस सुटून सकाळी ८.३० वाजता चोर्ला येथे पोहोचणार आहे. तसेच सायंकाळी ३.४५ वाजता खानापूरहून बस सुटून सायंकाळी ५ वाजता चोर्ला गावात पोहोचणार आहे.
आज सकाळी समाजसेवक इरफान तालीकोटी यांच्या हस्ते बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राजू डांगे, सुरेश केरकर, संजय पाटील (तोराळी), कृष्णा गावकर, बोंबडा गावडे, रामा गावकर, दशरथ म्हाजिक, धोंडिबा गावडे, फट्टू गावकर, म्हालू गावकर, प्रकाश ओऊळकर, अनंत गावडे, विठ्ठल गावस यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

अनेकवेळा पाठपुरावा करून बसची व्यवस्था केली : इरफान तालीकोटी
यावेळी बोलताना इरफान तालीकोटी म्हणाले की, “तीन महिन्यांपूर्वी मी चोर्ला गावच्या भेटीसाठी आलो होतो. त्यावेळी गावकऱ्यांनी बससेवेची मागणी माझ्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत विधान परिषद सदस्य चंद्रराज हट्टीहोळी यांची भेट घेऊन त्यांच्याकडून शिफारस पत्र घेतले व ते बस विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दिले. मात्र, त्यानंतरही बससेवा सुरू होण्यास बराच विलंब झाला. त्यामुळे पुन्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे पत्र घेऊन हुबळी येथे संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर चोर्ला गावासाठी बससेवा सुरू झाली.”
पद नसतानाही जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव पुढे!
कोणत्याही पदावर नसतानाही जांबोटी पश्चिम भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने पुढाकार घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणून समाजसेवक इरफान तालीकोटी यांची ओळख निर्माण झाली आहे. गावकऱ्यांनी मांडलेल्या समस्यांचा पाठपुरावा करून त्या सोडविण्यासाठी ते नेहमीच पुढे असतात.
जांबोटी येथील श्रीराम मंदिरासाठी निधी मिळवून देण्यासाठीही तालीकोटी प्रयत्नशील असून, पश्चिम भागातील विविध सामाजिक व विकासात्मक प्रश्नांवर त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. चोर्ला गावाला दिलेला शब्द पूर्ण करून त्यांनी पुन्हा एकदा आपल्या कार्याची प्रचिती दिल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी चोर्ला भागात मोबाईल टॉवरची व्यवस्था करून देण्याची मागणी केली, त्यावर मी याही कामांसाठी सदैव प्रयत्नशील राहीन अशी ग्वाही इरफान तालीकोटी यांनी यावेळी दिली.