नीडगलमधील श्री सिद्धेश्वर सोसायटी अध्यक्षांवर ‘ वनमॅन ‘शो’ चा आरोप; गावातच एक कोटीच्या एफडी अडकून, ठेवीदार कोर्टात!

0
IMG_20260827_075104

अध्यक्ष गणपत पाटील यांनी आरोप फेटाळला;  संचालक मंडळ म्हणते कर्ज भरणा झाल्यानंतर सर्व एफडी परत करू, सोमवारी पार पडली संचालक मंडळाची बैठक, शुक्रवारी पुन्हा संचालक मंडळाची बैठक बोलावून कर्जदारांना अंतिम वॉर्निंग देणार…

खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर )

         खानापूर तालुक्यातील अनेक सोसायट्यांचा वृत्त प्रसिद्ध करत असतानाच आणखी एका सोसायटीची बातमी लोकहित न्यूज’च्या हाती  लागली आहे, निडगल येथील श्री सिद्धेश्वर मल्टी मल्टीपर्पज सोसायटीचे गेल्या तीन वर्षांपासून ऑडिट झालेले नसून, या गावातच जवळपास एक कोटीच्या ठेवी अडकून पडल्या आहेत, त्याहून अधिक दिलेले कर्ज असून, ते वसूल होताच सर्वांच्या ठेवी देण्यात येतील असे संचालक मंडळ सांगत आहे, पण, गेल्या तीन वर्षांपासून अनेकवेळा आपली एफडी ( ठेवी) मागूनही सोसायटीकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने नीडगल येथील ठेवीदार अमित प्रकाश सुतार यांनी हे प्रकरण कोर्टात दाखल केले आहे. सुतार यांच्या लाखोंच्या ठेवी अडकून पडल्या असून, त्या तात्काळ मिळाल्या पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. या सोसायटीमध्ये अध्यक्ष गणपत पाटील यांचेच वन मॅन शो अर्थात एकट्यांचाच अधिकार चालतो असा आरोप होत आहे, तर दुसरीकडे श्री.पाटील यांच्याशी लोकहित न्यूज ने संपर्क साधला असता, त्यांनी तो आरोप फेटाळून लावत आम्हीं सर्व जण मिळून काम करत असल्याची माहिती त्यांनी दिली.

लोकहित न्यूज ने  संपर्क साधताच संचालक मंडळाने घेतली सोमवारी बैठक; पुन्हा शुक्रवारी बैठक घेऊन कर्जदारांना अंतिम वॉर्निंग देणार…

    गेल्या पंधरा दिवस आधीच ही बातमी लोकहित न्यूज ला समजली होती, त्यामुळे  म्हणणे ऐकून घेण्यासाठी लोकहित न्यूज ने संचालक मंडळाशी संपर्क साधला असता, त्यांनी तात्काळ लोकहित न्यूज च्या संपादकांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले, शिवाय कालच्या सोमवारी सोसायटीत संचालकांची बैठक बोलावून कर्ज वसुली आणि ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी कर्जदारांनी भेट घेऊन वसुलीचा जोरदार सपाटा लावूया असे ठरविण्यात आले, त्यासाठी पुन्हा एकदा शुक्रवारी बैठक घेऊन कर्जदारांना अंतिम वॉर्निंग देण्यात येणार असून, कोणी दिलेल्या वेळेत कर्ज न भरल्यास संबंधितांवर तात्काळ केस दाखल करण्यात येणार असल्याचे सोसायटीच्यावतीने कळविण्यात आले.

तीन वर्षे ऑडिट का नाही?

   कोणत्याही सोसायटीचे ऑडिट रेग्युलर (कायम) राहिल्यास सोसायटीचे खरे अस्तित्व दर्शविते, या सोसायटीचे गेल्या तीन वर्षांपासून ऑडिटच नाही , काहीं दिवस तर सोसायटी कार्यालय बंद -चालू अवस्थेत आहे. ऑडिटबद्दल अध्यक्ष गणपत पाटील यांना विचारले असता,त्यांनी सोसायटीत पैशेच शिल्लक नसल्याने कसे करणार ऑडिट असे उत्तर दिले. त्यामुळे सोसायटीवर इतकी वाईट आर्थिक परिस्थिती कशी ओढवली आणि कारणीभूत कोण? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.

अधिकाधिक गावात अन् जवळच्याच पै- पाहुण्यात कर्ज वाटप आता मात्र,वसुली होईना!

    या सोसायटीतील लोन अर्थात कर्ज गावातील संचालकांच्याच जवळच्याच  पै -पाहुण्यांना दिले असल्याने ते आता वसुल होण्यास अनेक अडचणी येत आहेत, एक कोटीहून अधिक एफडी (ठेवी) आहेत तर एक कोटी चाळीस लाखांच्या घरात कर्ज वाटण्यात आले आहे. सदर कर्ज वसूल झाल्यास सर्वच एफडी (ठेवी) परत मिळण्यास कोणतीच अडचण नसेल,अशी माहिती संचालकांनी लोकहित न्यूज शी बोलताना दिली. त्यामुळे कर्ज घेतलेल्या नागरिकांनीही वेळेत कर्ज भरणे गरजेचे आहे, तरच इतरांच्या ठेवी परत मिळतील अशाच प्रतिक्रिया सहकार क्षेत्रातून व्यक्त होत आहेत.

प्रतिक्रिया –

   आम्हीं गेल्या तीन वर्षांपासून अनेकवेळा सोसायटीकडे आमच्या ठेवी परत करण्याची मागणी करत आहोत पण, सोसायटीकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने वकिलांमार्फत हे प्रकरण कोर्टात दाखल केले आहे. आमच्या लाखोंच्या ठेवी अडकून आहेत, डीआरओनाही याची माहिती दिली असून, त्यांच्याकडूनही लागणारी कागदपत्रे घेतली असून, ती कोर्टात सादर केली आहेत, आमच्या ठेवी आम्हाला परत मिळाव्यात एवढीच आमची मागणी.

    –अमित सुतार, ठेवीदार निडगल.

    –विशेष चौकट-

ठेवीदारांसाठी विशेष सूचना…

लोकहित न्यूजच्या ‘काय करायचे अशा सोसायट्यांचे  या मालिकेमुळे खानापूर तालुक्यासह जिल्ह्यातील बुडीत मार्गावर असलेल्या तसेच सुरू असलेल्या सोसायट्यांचे धाबे दणाणले असून, कर्ज वसुली, सुरळीत व्यवहार तसेच ऑडिटसह सर्वच सेवा सुरळीत करण्याचे काम सुरू आहे, तसेच या मालिकेमुळे खानापूर तालुक्यातील अशा सोसायट्यांची सद्यस्थिती बाहेर येत आहे. ठेवीदारांनी पुढे आल्याशिवाय काहीही होणार नाही, म्हणजेच काय तर डीआरओना भेटणे, सरकारी पातळीवर आपल्या ठेवी मिळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तरच तुमचे पैसे मिळतील नाही तर गेल्यात जमा असे सहकार क्षेत्रातील जानकर सांगतात.

       


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed