आमदार विठ्ठल हलगेकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र – मराठी माध्यमावर अन्याय नको; तात्काळ राज्य शिक्षक भरतीत मराठीचा समावेश करा!
कोणावरही अन्याय होणार नाही अशी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडून हमी; खानापूर तालुक्यातील मराठी शाळांवर अन्याय नको..

बंगळूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
गेल्या शेकडो वर्षांपासून बेळगांव -खानापूर सीमाभागात मराठी आणि कन्नड या दोन्हीं भाषा आणि भाषिक गुण्या गोविंदाने राहतात, आतापर्यंत कर्नाटक सरकारने मराठी शाळांना सर्व सुविधा आणि सेवा पुरवल्या असतानाच, नुकत्याच कर्नाटकात 15 हजार शिक्षकांची भरती करून घेण्यात येणार आहे, मराठी माध्यमासाठी 195 जागा रिक्त असताना सदर भरतीत मराठीचा समावेश केलेला नाही, त्यामुळे मराठी माध्यमावर अन्याय झाला असून, शेकडा डीएड, बीएडधारकांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी तात्काळ जाहीर केलेल्या शिक्षक भरती यादीत मराठीचा समावेश करावा अशी मागणी खानापूरचे लोकप्रिय आमदार विठ्ठल हलगेकर यांनी मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांना पत्राद्वारे केली आहे. त्यावर लवकरात लवकर या समस्येचा पाठपुरावा करून, चालु भरतीत मराठीचा समावेश करा, कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी उत्तरादाखल दिली आहे.
आमदारांनी मुख्यमंत्र्यांना दिलेले पत्र…
सध्या सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये रिक्त असलेल्या १९५ मराठी माध्यम शिक्षकांच्या जागांचा त्वरित समावेश करावा, अशी जोरदार मागणी खानापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री विठ्ठलराव हलगेकर यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी नुकतेच एक पत्र पाठवले असून, मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या डी.एड. आणि बी.एड. अर्हताप्राप्त उमेदवारांवर होत असलेला अन्याय दूर करण्याची मागणी केली आहे.*
पत्रातील प्रमुख मुद्दे-
-कर्नाटक शासनाच्या शिक्षण विभागामार्फत राज्यात सुमारे १५ हजार शिक्षक जागांची भरती प्रक्रिया सुरू आहे.
-बेळगाव विभागात यापूर्वी ३३१ शिक्षक जागा मंजूर झाल्या असल्या, तरी १२ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या नवीन अधिसूचनेत मराठी आणि इतर अल्पसंख्याक माध्यमांच्या रिक्त जागांची माहिती समाविष्ट करण्यात आलेली नाही.*
-खानापूर तालुक्यात एकूण २९७ रिक्त जागांपैकी तब्बल १९५ जागा मराठी माध्यमाच्या आहेत.*
-मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता भासत असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत आहे.*
-माध्यमिक शिक्षक भरतीच्या जीपीटी (GPT) व इतर प्रवर्गांच्या अधिसूचनेत मराठी माध्यमाच्या जागा योग्य रीतीने न जोडल्यामुळे, मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांचे भविष्य धोक्यात आले आहे.*
या पार्श्वभूमीवर, खानापूर तालुक्यातील बहुसंख्येने मराठी बोलणारे तालुके व शाळांची गरज लक्षात घेऊन, भरती प्रक्रियेत मराठी माध्यमाच्या १९५ जागांचा तात्काळ समावेश करावा, अशी मागणी आमदार श्री विठ्ठलराव हलगेकर यांनी केली आहे..
तालुक्यातून आमदारांचे आमदारांचे अभिनंदन…
मराठीसाठी वेळीच दखल घेऊन मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केल्याबद्दल आमदार विठ्ठल हलगेकर यांचे खानापूर आणि बेळगावमधून अभिनंदन केले जात आहे…