पाच वर्षे नोकरी त्यानंतर पर्मनंट करतो म्हणून मधल्या एजंटांकडून युवकांना भूलथाप; प्रत्यक्षात 22 महिने काम शिवाय दिलेल्या बाँडवर कामाबद्दल कोणताच उल्लेख नाही, जिल्हा पंचायतीकडून दाखल चौकशी होणार…
खानापूर:लोकहित न्यूज विलास कवठणकर
बंगळूर येथील भविष्य बेळकु ट्रस्टच्या नावाखाली काहीं युवकांकडून प्रत्येकी अडीच लाख रुपये घेतल्याची जोरदार चर्चा जांबोटीसह
खानापूर तालुकाभर रंगली आहे. लोकहित न्यूज कडे नागरिकांच्या तशा प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. त्यामध्ये कोणी अडीच लाख, कोणी दोन लाख,कोणी लाख तर कोणी पन्नास हजार दिल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. पण, प्रत्यक्षात 22 महिने काम देण्यात येणार असून, तसाही उल्लेख भविष्य बेळकु ने दिलेल्या बाँडवर नाही. त्यामुळे रुजू झालेल्या युवकांची पुरती फसवणूक झाली असून, याला जबाबदार कोण? लोकहित न्यूज च्या वृत्ताची दखल जिल्हा पंचायतीने घेतली असून, दोन दिवसांत जिल्हा पंचायत कार्यालयात हजर राहण्याचा आदेश जिल्हा पंचायत डीएस- 2 बसवराज अडवीमठ यांनी भविष्य बेळकुचे बेळगाव कोऑर्डीनेटर राजू यांना दिला आहे. त्यामुळे जिल्हा पंचायतीकडून नक्कीच कारवाई होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे
पैशे उकळण्यासाठी बेळगांव, खानापूर, जांबोटी आणि बीडीपर्यंच्या एजंटांचे हात असल्याचा आरोप…
भविष्य बेळकु या सानजिक ट्रस्टचा वापर करून बेळगांव खानापूर जांबोटी आणि बीडीपर्यंच्या एजंटांनी अडीच लाख रुपये उकळून हात धुवून घेतल्याची जोरदार चर्चा तालुक्यात सुरु आहे. पण, भविष्य बेळकु ट्रस्ट मधील कोण तरी सामील असल्याशिवाय इतका मोठा घोटाळा होणे सध्याच नाही असाही मतप्रवाह आहे. इतकी मोठी रक्कम एका सामाजिक ट्रस्टच्या नावाने उकळणे अजिबात सोपे नाही. आता मात्र, बेळकुच्या पदाधिकाऱ्यांना याचे परिणाम भोगावे लागणार हे नक्कीच!
अजूनही मधले एजंट पैशांची मागणी करतच होते…
नागरिकांच्या माहितीनुसार अडीच लाख रुपये घेऊनसुद्धा या एजंटांची झोळी भरली नव्हती त्यामुळे अजूनही ते लोक नागरिक युवकांकडे पैसे मागतच होते.
‘लोकहित न्यूज’ दणक्याने एजंटांचे धाबे दणाणले…
लोकहित न्यूजने 14 जुलैच्या अंकात प्राथ. हायस्कूल आणि कॉलेजना अटेंडर सीट किती रुपयांची असे वृत्त प्रसिद्ध केले होते, लागलीच याचा दणका बसल्याने एजंटांचे धाबे दणाणले आहेत. जिल्हा पंचायतीकडून या प्रकरणाची सखोल चौकशी होणार हे निश्चित!
भविष्य बेळकु युवकांच्या ‘भविष्या’शी खेळते का?
बंगळूर येथील भविष्य बेळकू नामक ट्रस्टची बेळगावात शाखा असून, त्यांच्याकडून जिल्ह्यातील प्राथमिक, हायस्कूल आणि कॉलेज अशा एकूण 375 शाळांची अटेंडर सीट नेमणुकीची परवानगी सरकाकडून मिळाली आहे. त्यानुसार जर ठिकठिकाणच्या एजंटांनी वसुली केली तर कोटींच्या घरात जाईल हिशोब असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर उरलेल्या शाळा कॉलेजना दुसऱ्या ट्रस्टनी परवानगी मिळविली आहे, अशा एकूण 465 प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि कॉलेजना अटेंडर सीट नेमणुकीची परवानगी सरकारकडून देण्यात आली आहे.
प्रतिक्रिया –
सामाजिक सेवेच्या नावाखाली जर कोणी पैशे घेत असेल तर त्यांची अजिबात गय केली जाणार नाही, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल..
-बसवराज अडवीमठ, डेप्युटी सेक्रेटरी जिल्हा पंचायत बेळगांव.
(उद्याच्या भागात नावानिशी सविस्तर माहिती प्रसिद्ध करू)
