बेळगांव, खानापूर तालुक्यातील पश्चिम भागात भूगर्भ खात्याची शोधाशोध सुरूच…
बडस : लोकहित न्यूज ( विलास कवठणकर)
बेकायदेशीररित्या उत्खनन करणाऱ्या इनाम -बडस (ता.बेळगांव) येथील जमीनीवर अचानक भूगर्भ खात्याने छापा टाकून धडक कारवाई हाती घेतली आहे. जिल्हा भूगर्भ खात्याचे अधिकारी बिंदन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी ही कारवाई करण्यात आली. अचानक छापा टाकल्याने उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास आले, अधिकारी आल्याचे समजताच माफियांनी तेथून पळ काढला. याप्रकरणी जमीन मालकाला भूगर्भ खात्याने नोटीस बजावली असून, त्यामध्ये आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यानंतरच पुढील कारवार करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या धडक कारवाईत बेळवट्टीचे तलाठी शिवकुमार यांचाही सहभाग होता.
लॅटराईसाठी सुरू होते बेकायदेशीर उत्खनन…
इनाम -बडसमधील सदर खनिज उत्खनन हे लॅटराईसाठी सुरू होते अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे. मात्र, त्याला कोणतेही कायदेशीर परमिशन नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, शिवाय त्यासाठी संबंधित शेती मालकाने कायदेशीर परवानगी घेतली आहे का? याचा तपास कागदपत्र तपासणीनंतरच या सर्व गोष्टींचा उलगडा होणार आहे. प्राथमिक माहितीनुसार हे खनिज उत्खनन बेकायदेशीररित्या सुरू होते, त्याची मध्यरात्री वाहतूक होत असल्याचेही स्पष्ट होत आहे.
आठवड्यापासून खानापूर,बेळगांव तालुक्याच्या पश्चिम भागात भूगर्भ खात्याची शोधाशोध सुरू…
खानापूर तालुक्याच्या जांबोटी आणि बेळगावच्या बेळगुंदी पश्चिम भागांत गेल्या आठवड्यापासून भूगर्भ खात्याचे अधिकारी फिरत असून, त्यांची शोधाशोध सुरु आहे. तीन दिवसापूर्वी जांबोटीजवळील आमटे परिसरातही अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली आहे, मात्र, याठिकाणी कोणते उत्खनन दिसून आले नाही. त्यामुळे खानापूर तालुक्यातील गोल्याळी आणि त्या लगत असणाऱ्या बेळगाव तालुक्यातील बेळवट्टी, इनाम -बडसकडे अधिकाऱ्यांनी आपला मोर्चा वळविला. अन् तेथे खनिज उत्खनन सुरू असल्याचे दिसून आले.
माफियांचे धाबे दणाणले खरे; पण, ही कारवाई कायम राहणार का? ..
भूगर्भ खात्याच्या या धडक कारवाईने मोकाट सुटलेल्या खनिज माफियांचे धाबे दणाणले खरे, पण ही कारवाई कायम राहणार की, साटेलोटे झाल्यानंतर थांबणार असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे. कारण, की आतापर्यंत हप्त्यांवरच असे बेकायदेशीर धंदे चालले असून, याला अधिकाऱ्यांचाच आशिर्वाद मिळाल्याचे दिसून आले आहे. नवीन अधिकारी येतात, कारवाई करून दाखवतात अन् मलिदा अर्थात कमिशन मिळाल्यानंतर सर्वकाही चिडीचूप होते. त्यामुळे याही कारवाईबाबत असाच संशय येवू नये म्हणून कशावरून?..






Leave a Reply