जांबोटी माध्यमिक विद्यालयाच्या ग्रंथालयाला IAHV यांच्याकडून पुस्तकांची देणगी प्रदान…
जांबोटी: लोकहित न्यूज
जीवन समृध्द व्हायचे असेल तर आजच्या जीवनात वाचन महत्वाचे आहे, त्यासाठी चांगली पुस्तके जगण्याची प्रेरणा अर्थात कला शिकवीतात असे मत कसबा बोरगाव (कोल्हापूर) येथील ज्योतिर्लिंग हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक दत्तात्रय लवटे यांनी प्रमूख वक्ते म्हणून बोलतांना मांडले. विश्वभारत सेवा समिती संचलित जांबोटी माध्यमिक विद्यालयाच्या ग्रंथालयाला आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या आंतरराष्ट्रीय मूल्य संस्था IAHV यांच्याकडून पुस्तकांची देणगी देण्यात आली. या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष विजय नंदीहळी होते. जांबोटी विद्यालयाचे मुख्याध्यापक महेश सडेकर यांनी स्वागत करतांना आजचा दिवस सोनियाचा असून, IAHV यांच्याकडून पुस्तकांची देणगी मिळाल्याने आमचे ग्रंथालय अधिकच समृध्द झाले असल्याचे सांगितले. यावेळी विद्यार्थांच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे अनुयायी रवी हिरेमठ यांच्याहस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले . रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाची सुरवात झाली. यावेळी रवी हिरेमठ, दत्तात्रय लवटे यांच्याहस्ते ग्रंथालय दालनाचे उद्घघाटन करण्यात आले. यावेळी पुढे बोलतांना, लवटे म्हणाले की, आपल्या मातृभाषेचे सौंदर्य पहायचे असेल तर विद्यार्थांनी आपल्या विकासासाठी पुस्तकांशी मैत्री केली पाहिजेत , तरच आपले जीवन समृध्द होईल असेही ते म्हणाले. यावेळी श्री.श्री रविशंकर यांच्या प्रेरणेतून मराठी, इंग्रजी आणि हिंदी मध्यमची सुमारे साडेचारशे पुस्तके यावेळी विद्यालयाच्या ग्रंथालयाला संपूर्त करण्यात आली. यावेळी आर्ट ऑफ लिविंग च्या प्रतिनिधी कु. पूजा माळी, शोभा लवटे, विजय नंदीहळी , रवी हिरेमठ यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. यावेळी सदर पुस्तके मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केलेल्या संपदा तिर्विर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी तुकाराम सडेकर यांनी सूत्रसंचालन केले तर दिनकर पाटील यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थ्यांसह नागरीक उपस्थित होते.

Leave a Reply