विकसित भारत -जी राम जी सुधारीत योजना ठरणार सर्वांचाच आधार: आ. विठ्ठल हलगेकर…


भाजपच्या पत्रकार परिषदेत दिली माहिती ; उद्या खानापूर भाजप कार्यालयात तालुक्यातील पंचायत अध्यक्ष- सदस्यांना निमंत्रण, या योजनेबद्दल देणार माहिती….

    खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर )

          नुकतेच केंद्रातील भाजप सरकारने आधी असलेल्या मनरेगा योजनेच्या नावासह नियम बदल करत, विकसित भारत- जी राम जी ही सुधारीत योजना आणली आहे, त्यातून सर्वच घटकांचा आधार ही योजने ठरणार असून, या योजनेअंतर्गत लहान शेती सुधारणेसह विविध सार्वजनिकसह वैयक्तिक विकास कामांचीचीही भर घालण्यात आली आहे, देशात बहूतेक राज्यांनी या विकसित योजनेचा आनंदाने स्वीकार केला असतांना कर्नाटक काँग्रेस सरकार जाणीवपूर्वक राजकारण करत असल्याची टीका आ. विठ्ठल हलगेकर यांनी केली. खानापूर भाजपच्यावतीने सोमवारी (26) यासंदर्भात पत्रकार परिषद घेण्यात आली होती, त्यावेळी आ. हलगेकर बोलत होते. यावेळी जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, माजी आमदार अरविंद पाटील, तालुका भाजप अध्यक्ष बसवराज सानिकोप, माजी अध्यक्ष संजय कुबल , जिल्हा महिला मोर्चा सचिव धनश्री सरदेसाई, युवा नेते पंडित ओगले, सचिव मल्लाप्पा मारीहाळ, गुंडू तोपिनकट्टी, माजी जिल्हा पंचायत सदस्य जोतिबा रेमानी, अँड.चेतन मनेरीकर, शरद केशकामत आदी पदाधिकारी उपस्थित होते. मल्लापा मारिहाळ यांनी स्वागत केले.

        पुढे बोलतांना, आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले की, विकसित भारत जी राम जी योजनेत अनेक बदल केलेले असून, त्यामुळे सर्व घटकांना त्याचा फायदा होणार आहे. पूर्वीच्या मनरेगा योजनेत असलेले अनेक नियम बदल करण्यात आले असून, पूर्वीच्या 100 दिवसाऐवजी 125 दिवस काम देण्यात येईल.  संबंधित गावांमध्ये ग्राम सभा घेऊन या योजनेचा ठराव करून काम करता येईल, यापूर्वी याच कामात मनमानीमुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत होता. आताच्या विकसित योजनेमुळे याला आळा बसेल. शिवाय अनेक लहान मोठ्या कामांचाही यात समावेश करण्यात आला आहे, त्यामुळे सर्व बाबतीत ग्रामीण विकास होणार आहे. या योजनेची माहिती ग्राम पंचायत सदस्य, अध्यक्ष आणि नागरिकांना पटवून देण्यासाठी कमिटी नेमण्यात आली असून, त्यांच्या मार्फत जागृती केली जाईल. मंगळवारच्या बैठकीला तालुक्यातील सर्व सदस्यांनी उपस्थितीत राहून याची माहिती जाणून घ्यावी असे आवाहन आ. विठ्ठल हलगेकर यांनी केले.

माजी आमदार अरविंद पाटील म्हणाले, या योजनेतील  राम नावाचा काँग्रेसला तिरस्कार असावा, कारण राममंदिर उभारतानाही काँग्रेसने याचे प्रदर्शन घडवून आणले होते. ही योजना गरिबांच्या हाताना काम देणारी ठरणार असून, त्याचे योग्य दामही मिळणार आहे असेही ते म्हणाले.

जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी म्हणाले, देशामध्ये बहुतेक राज्यांनी या योजनेचा स्वीकार केला असून, राज्य सरकाकडून जाणीवपूर्वक जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तो हाणून पाडण्यासाठी आम्हीं तालुक्यातील पंचायत अध्यक्ष, सदस्यांना उद्या (27) आमंत्रित केले असून, त्यांना तालुका भाजप पक्षाच्या कार्यालयात मार्गदर्शन करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

    यावेळी तालुका भाजप अध्यक्ष बसवराज सानिकोप यांनीही विकसित भारत जी राम जी योजना सदस्य आणि नागरिकांनी जाणून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

माजी तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल म्हणाले, संपूर्ण देशाने विकसित भारत जी राम जी योजनेचा स्वीकार केला असतांना, कर्नाटक सरकार जाणीवपूर्वक वाद निर्माण करू पाहत आहे, ते निंदनीय आहे. जगामध्ये भारत देश नंबर एक कसा होईल या दृष्टीने केंद्रातील मोदी सरकार मार्गक्रमण करत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *