सामान्य नागरिक म्हणतात..तालुक्यात काहीच राम राहिला नसून, सच्चा वाली नाही कोण उरला… वाळूसह इतर कमिशन हप्त्याच्या चौकशीची गरज.…
खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
आधीच 80 टक्के तालुका मराठीबहुल त्यात भोळी भाबडी जनता, त्याचाच फायदा उठवत भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांनी तालुका व्यापला आहे. त्यात आता आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या पीएच्या ऑडियोवरून अधिकाऱ्यांबरोबर आता नेतेही यात गुंतले आहेत का? असा संशय येवू लागला आहे. दोन दिवसांपूर्वी शिरोली ग्राम पंचायतीच्या फंड कमिशनचा ऑडियो जोरदार वायरल होत असून, यावरून राजकरण पेटणार असे दिसत आहे. त्यामुळे सामान्य जनतेतून एकच आवाज ऐकू येतो आहे, तो म्हणजे तालुक्यात आता काहीच राम राहिला नसून, तालुक्यात सच्चा वाली कोण उरला नाही! त्यामुळे जनता आता तरी जागृत होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आमदार पीए म्हणतात…मी टॅक्स भरायलोय, मला 25 टक्केच कमिशन हवे ….
तालुक्यात नेहमीच चर्चेत राहणाऱ्या शिरोली ग्राम पंचायतीत 20 लाखाचा निधी मंजूर करून देण्यासाठी आ. विठ्ठल हलगेकर यांच्या पीएने 25 टक्के कमिशन मागितल्याचा ऑडियो जोरदार वायरल झाला आहे. या ऑडियोमध्ये पीए आणि शिरोलीचे प्रभावी नेते कृष्णा गुरव आणि दिपक गवाळकर यांचे संभाषण ऑडियो वायरल झाला आहे. त्यात कृष्णा गुरव पीएना म्हणतात, साहेब तुमचे किती कमिशन हो! त्यावर पीए म्हणतात मी मंजुर झालेल्या 20 लाखाच्या फंडाचे 10 टक्के टॅक्स भरले आहे, त्यामुळे मला 25 टक्केच कमिशन हवे आहे असे पीए म्हणतात, तर दुसऱ्या बाजूने कृष्णा गुरव म्हणतात अहो साहेब 20 टक्के म्हणायलेत हो ,25 टक्के फार होते , आम्हाला काम करणाऱ्यांना कशे परवडणार? असा प्रश्न उपस्थित केला. तरीही पीए ऐकत उलट ते काम चेंज ऑफ नेम करता येते असे सांगून अधिकच ‘भ्रष्टपणा ‘ दाखवत आहेत, म्हणावे या कारभाराला?..
..त्या पीएची ‘नार्को टेस्ट’ करा; या मागणीसाठी गृहमंत्री डॉ. जी. पी. परमेश्वर भेटणार : तालुका काँग्रेस.….
ग्राम पंचायत स्तरावर 25 टक्के कमिशन मागणाऱ्या ‘त्या’ आमदार पीएची नार्को टेस्ट करा, या मागणीसाठी उद्यापासून बेळगावात सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात राज्य गृहमंत्री डॉ. जी. पी परमेश्वर यांना भेटून ही तक्रार करणार असल्याचे तालुका ब्लॉक काँग्रेसच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे. सदर ऑडियो ऐकल्यानंतर जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे, यासाठी नागरिकांनी यासाठीच मत दिले होते का? असा प्रश्न तालुका काँग्रेस नेत्यांकडून विचारण्यात येत आहे.
‘त्या’ ऑडियोची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल: आ. विठ्ठल हलगेकर…
तालुकाभर ऑडिओ जोरात वायरल होत आहे, पण , मला याची अजिबात कल्पना नाही. जर खरोखर आमच्या पीएने कमिशन मागितले असेल तर या प्रकरणाची नक्कीच चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येणारच. पण, पहिल्यांदा ‘त्या’ ऑडिओची पडताळणी करण्यात येईल. कोण? कितपत खरे आहे याचाही तपास नक्कीच होईल. आम्हीं ग्राम पंचायतीत कधीही हस्तक्षेप केला नाही आणि करणारही नाही, अशी प्रतिक्रिया आमदार विठ्ठल हलगेकर लोकहित न्यूज शी बोलतांना दिली..
तालुक्यात इतर बाबतीतही कमिशन हप्त्याची चौकशी होणे गरजेचे: सामान्य जनता…
तालुक्यात सद्या अशी परिस्थिती आहे की, तुम्हीं कोणत्याही ऑफिस मध्ये जा, तिथे कमिशनशिवाय फाईल पुढे सरकतच नाही. त्यामुळे अशा कारभाराला सामान्य जनता कवटाळून गेली आहे. तहसीलदार कार्यालयाबाबत तर कोणी बोलूच नये! तालुका पंचायत आणि ग्राम पंचायतीही आणि तिथले पीडीओ किती धुतल्या तांदळासारखे आहेत याचाही तपास व्हावा. शिवाय खानापुरात बंदी असतानाही वाळू वाहतूक कोणत्या अधिकाऱ्यांच्या की, नेत्यांच्या आशीर्वादाने सुरू आहे, आणि याचे कमिशन कोण कोण घेताहेत हेही तपासणे आवश्यक आहे, कारण, एक तर तालुक्यात वाळू वाहतूक परमिशनच नाही, ती कमिशन अर्थात महिन्याला लाखाच्या घरात हप्ते घेवून वाळू वाहतूक सुसाट सुरू आहे, कारण, वाळूवरही सामान्य जनताच पोट भरते. त्यामुळे त्यांच्याकडून कमिशन हप्ते घेणे म्हणजे तीही एक लुबाडणूकच आहे ना! पोलिसाबरोबर आणखी कोण कोण आधिकारी आणि प्रिय नेते गुंतले आहेत याचीही खात्री तालुकावासियांना झाली पाहिजे नाही का? अशा प्रतिक्रिया सामान्य नागरिकांतून व्यक्त होताना दिसत आहेत…






Leave a Reply