गावातून कौतुकाचा वर्षाव; ज्येष्ठ नागरिक म्हणतात – युवकांनी असेच सामाजिक कार्यासाठी पुढे आले पाहिजे…
बैलुर : लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
आजच्या स्वार्थी युगात सार्वजनिक कार्यात भाग घेणाऱ्यांची संख्या हातावर मोजण्याइतकीच उरली आहे. त्यात गावच्या कामात पुढाकार घेणे म्हणजे तेही आज जिकिरीचे बनले आहे. खानापूर तालुक्यातील बहुतेक गावात अद्यापही स्मशान भूमीची व्यवस्था नाही, तर बैलुर वाड्यासाठी बांधण्यात आलेल्या स्मशान शेडला झाडी झझुडूपांनी वेढले होते, अशावेळी अनेकवेळा मागणी करूनही ग्राम पंचायतीकडून डोळेझाकपणा चालला होता. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत येथील नवक्रांती युवक मंडळाने स्व:खर्चातून स्मशान शेडची स्वच्छता, होमहवन करत धार्मिक विधी हाती घेण्यात आला. यासाठी लागणारा जेसीबी खर्च , येथील झुडूपांची स्वच्छता या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केली, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते मंगेश मुळीक यांनी लोकहित न्यूज शी बोलताना दिली.
..या सामाजिक कार्याबद्दल गावकऱ्यातून कौतुक…
नवक्रांती युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या या सामाजिक कार्याबद्दल गावकऱ्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. स्मशान भूमीची स्वच्छता करणे म्हणजे वैकूंठाची स्वच्छता केल्यासारखेच असल्याच्या प्रतिक्रिया ठिकठिकाणी उमटत आहेत.






Leave a Reply