सदर झाड तत्काळ हटवण्याची मागणी; रेंजर दोन दिवसात करणार पाहणी..
जांबोटी: लोकहित न्यूज..
गेल्या पंधरा वर्षात खानापूर – जांबोटी रस्त्याच्या समस्या संपता संपेनात, त्यात आता आणखी एका मोठ्या समस्येची भर पडली आहे. या रस्त्यावरील ओलमणी गावच्या पाण्याच्या टाकीकडील वळणावर एक भले मोठे ‘झाड’ रस्त्याच्या बाजूला कलंडले असून , याठिकाणी कोणत्याही क्षणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे. शिवाय येथून दोन वाहनांना बाजू देतांना मोठी अडचण होत आहे. सद्या ऊस तोडणीचे हंगाम सुरू झाले असून, ऊस भरलेल्या ट्रॅक्टरांसाठी तर फार मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तत्काळ हे धोकादायक झाड वनखात्याने हटवावे अशी मागणी प्रवाशी आणि स्थानिक नागरिकांतून होत आहे.
शंकर पेठमधील दोन्हीं चढतींवर बांबू ,झाडांचा धोका कायमच …
याच मार्गावरील शंकरपेठकडील दोन्हीं बाजूच्या चढतींवर रस्त्यावर बांबू आणि झाडांचा धोका कायम आहे, बांबू रस्त्यावरून या बाजूने त्या बाजूला गेले आहेत तर दोन्हीं बाजूच्या वळणांवर झाडांचा धोका कायम आहे. याचीही वनखात्याने पाहणी करून तत्काळ हे धोके दूर करावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.
आमदार हलगेकर साहेब तुम्हीही जरा लक्ष द्या की….
या रस्त्याचा विकास कधी पूर्ण होतो ते देवच जाणे! पण किमान धोकादायक झाडे तरी तत्काळ हटवण्याची गरज आहे. याकडे जरा आमदार हलगेकर साहेब तुम्हीही लक्ष द्या की अशी हाक नागरिकांतून ऐकू येत आहे.
प्रतिक्रिया –
लोकहित न्यूज ने खानापुरचे रेंजर श्रीकांत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी दोन दिवसात सदर झाडाची पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही दिली.
प्रतिक्रिया
हे झाड धोकादायक स्थितीत असून, कधीही पडून अपघात होवू शकतो. सद्या ऊस तोडणी सुरू असून, उसाच्या ट्रॅक्टरसाठी तर हा फारच मोठा धोका निर्माण झाला आहे. याची दखल घेवून वनखात्याने तात्काळ हे झाड हटवावे अशी आमची मागणी.
-यशवंत पाटील, माजी ग्राम पंचायत सदस्य दारोळी.






Leave a Reply