अनेक राजकीय घडामोडीनंतर ‘अखेर’ अरविंद पाटील यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड..
खानापूर:: विलास कवठणकर ( विशेष संपादकीय ! लोकहित न्यूज)
राजकारणात कोणत्या क्षणी कशी कलाटणी होईल हे सांगता येत नाही. राजकारण हे नसा नसात असावे लागते, त्याशिवाय चिकाटी संयम, राजकीय डावपेच हेच राजकारणाला विजयाच्या शिखरावर घेऊन जातात. असाच प्रवास गेली वीस वर्षे सलग डीडीसीवर विराजमान असलेल्या अरविंद पाटील यांचा राहिला आहे. यावेळच्या राजकरणात मध्यंतरी ‘पाटील’ यांनी चक्रव्यूहात अडकणार की, काय असेच चित्रं दिसत होते, कारण राज्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे बंधू विधान परिषद सदस्य चनराज हट्टीहोळी आणि तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी यावेळी अरविंद पाटील यांचा विजयरथ रोखण्यासाठी कंबर कसली होती. त्यात रंगतही आली होती, त्यामुळे हे राजकारण कोणत्या वळणावर जाणार? असा प्रश्न असतानाच अरविंद पाटील यांना माजी आमदार आणि राज्यस्तरीय वजन असलेल्या अखिल भारतीय काँग्रेस सचिव डॉ.अंजली निंबाळकर यांनी मदतीचा हात दिला आणि अरविंद पाटील यांना अधिकच बळ मिळाले. दोघीही कॉग्रेसच्या नेत्या असलेल्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि माजी आमदार अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव तथा माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्यातच रंगत होणार असे दिसत असतांना, राज्याच्या राजकारणातील किंगमेकर अशी ओळख असलेल्या जारकीहोळी बंधूंच्या वजनामुळे संपूर्ण चित्रं बदलत पुढील राज्यस्तरीय गणिताच्या गोळाबेरजेत अरविंद पाटील यांच्या बरोबरीचे उमेदवार म्हणून ओळख निर्माण होत असलेल्या विधान परिषद सदस्य चनराज हट्टीहोळी यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने या राजकारणाचा वेगच मंदावला. तरीही मी मैदानात असेन अशी घोषणा आमदार विठ्ठल हलगेकर यांनी पत्रकार परिषदेत करत ,काही दिवस धावपळही केली पण.. त्यांच्याही वेगात वरिष्ठ नेत्यांच्या ‘ब्रेक’ लागला. आणि संपूर्ण राजकारणच पलटून गेले अन् अरविंद पाटील यांनी बिनविरोध बाजी मारली!
यापुढचे तालुक्याचे राजकारण ढवळून निघण्याचे चिन्हं! कार्यकर्त्यांनो सावधान! कारण, नेत्यांचं काहीं खरं नाही ह!
पाचव्यांदा डीसीसीवर संचालक म्हणून बिनविरोध निवडून आलेल्या अरविंद पाटील यांच्या विजयाने खानापूर तालुक्यातील पुढची राजकीय गणिते वेगळी असणार आहेत, कारण अरविंद पाटील आणि विद्यमान आमदार विठ्ठल हलगेकर हे दोघेही एकाच ( भाजप) या पक्षातील नेते असले तरी या राजकारणात त्यांच्यात नाराजीचा सूर कमी होताना दिसत नाही. त्यात डीसीसीच्या राजकारणाच्या निमित्ताने आणि राज्यस्तरीय नेत्यांच्या पुढच्या राजकीय गणितामध्ये बेळगांव जिल्ह्यातच काँग्रेस आणि भाजप एकत्र आल्याचे दिसून आले. त्यामुळे या दोस्तीचा परिणाम येणाऱ्या पुढच्या राजकारणात होणार का? असा प्रश्न आहे. कारण, दोन्हीं पक्षमध्येच पुढच्या निवडणुका राजकारण होणार यात शंका नसेल. पण, डीसीसी निवडणूक आणि राज्यस्तरीय नेत्यांच्या स्वतः साठीच्या सोयीस्कर डावपेचामुळे पक्षांमध्ये असणारे राजकारण प्रभावी नेत्यांच्या भोवती फिरतांना दिसत आहे. यात महत्वाचे म्हणजे दोन्हीं पक्षाच्या कट्टर कार्यकर्त्यांची मात्र, पुरती गोची होणार हे माञ नक्कीच! हेच चित्रं आताच्या डीसीसीच्या राजकरणात पहायला मिळाले आहे. कट्टर विरोधक असणाऱ्या भाजप आणि काँग्रेस मिळून राजकारण केले . याचे कारण असे की, नेत्यांनी जिल्ह्यावर आपला दबदबा अर्थात वजन ठेवण्यासाठीच हे मनोमिलन झाल्याचे दिसून आले. त्यामुळे दोन्हीं पक्षाच्या कार्यकर्त्यांची चांगलीच पंचाईत झाल्याचे दिसून आले. याचा परिणाम खानापूर तालुक्याच्या पुढील राजकारणावर पडण्याचे चिन्हं दिसत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्ष आणि नेत्यांसाठी कट्टर आपल्या जवळील मित्रांशी राजकारणाच्यावेळी कशे वागले पाहिजेत हा त्यांच्यासाठी चिंतनाचा विषय आहे.. त्यामुळे यापुढील खानापूर तालुक्यातील राजकारण ढवळून निघणार असे चिन्हं दिसू लागले आहे. ..







Leave a Reply